Latest

कोल्हापूर जिल्ह्यात ६३०० विद्यार्थी बोगस! ‘डुप्लिकेट’ नावे रेकॉर्डवर चढवली

अमृता चौगुले

कोल्हापूर; प्रवीण मस्के : यावर्षीच्या शिक्षक संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये राज्यातील शाळांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या लाखो विद्यार्थ्यांची 'डुप्लिकेट' नावे रेकॉर्डवर चढवली आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 300 विद्यार्थी आहेत. शिक्षण संचालक कार्यालयाच्या पडताळणीत शाळांची ही 'सरल' बनवाबनवी उघड झाली. या शाळांवर कारवाईचे संकेत राज्याचा शिक्षण संचालकांनी दिले.

दरम्यान, शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थी पटसंख्येनुसार नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थी संख्या सरल प्रणालीत शाळांनी नोंदवणे गरजेचे होते. त्यानुसार आधार नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संचमान्यता होऊन शिक्षकांची निश्चिती होणार आहे. राज्यातील सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या शाळांनी पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी सरल प्रणालीत भरली. परंतु या ऑनलाईन आकडेवारीची शिक्षण संचालनालयात तपासणी केल्यानंतर राज्यभरातून तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नावे डुप्लिकेट असल्याचे आढळून आले. काही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची नावे दोन शाळांमध्ये किंवा वर्गात नोंदवली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी काही दिवसांपूर्वी सरल प्रणालीत अद्यायवत करण्यात आली. यात 6 हजार 300 विद्यार्थी डुप्लिकेट असल्याने निदर्शनास आले आहे. हातकणंगले (1412) व कोल्हापूर महापालिका क्षेत्रात (1380) सगळ्यात जास्त डुप्लिकेट विद्यार्थी आहेत. सर्वच तालुक्यांतील शाळांनी बारावीच्या सर्वाधिक 1629 डुप्लिकेट विद्यार्थ्यांची नावे नोंदवली आहेत. पहिलीचा वर्ग (9), दुसरी (188), तिसरी (420), चौथी (522), पाचवी (397), सहावी (369), सातवी (543), आठवी (507), नववी (675), दहावी (758), अकरावीच्या (283) डुप्लिकेट विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या पालकांचे स्थलांतर यामुळे एकाच विद्यार्थ्याची दोन ठिकाणी नोंदणी होऊ शकते. आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी केल्याने डुप्लिकेट विद्यार्थी वाढले असण्याची शक्यता असल्याचे शिक्षणाधिकारी यांचे म्हणणे आहे.

तालुकानिहाय 'डुप्लिकेट' विद्यार्थी संख्या

  • आजरा – 125
  • भुदरगड -353
  • चंदगड -145
  • गडहिंग्लज -377
  • गगनबावडा – 30
  • हातकणंगले – 1412
  • कागल – 498
  • करवीर – 644
  • पन्हाळा – 513
  • राधानगरी – 221
  • शाहूवाडी – 159
  • शिरोळ – 443
  • कोल्हापूर (मनपा क्षेत्र) – 1380

सरल अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये नोंद झालेल्या डुप्लिकेट विद्यार्थ्यांची नावे तपासण्याचे काम सुरू आहे. डुप्लिकेट नावे वगळण्यासंदर्भात सर्वच शिक्षणाधिकार्‍यांना कळविले आहे. पडताळणीत शाळांनी चुकीचे काम केल्यास त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. शिक्षक अतिरिक्त होत असतील तर त्यांच्या समायोजनाबाबतची योग्य ती कार्यवाही केली जाईल.
– दत्तात्रय जगताप,
शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य

जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे 6 हजारांहून अधिक डुप्लिकेट विद्यार्थ्यांची नावे सरल प्रणालीत नोंदवली गेली आहेत. कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांची नोंद झाली, याची पडताळणी करण्यासाठी पुढील आठवड्यात शाळांचा कॅम्प लावला जाणार आहे. यात जाणीवपूर्वक शाळांनी डुप्लिकेट नावांची नोंद केल्याचे आढळून आल्यास त्या शाळांवर कारवाई होईल.
– एकनाथ आंबोकर,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT