पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के म्हणजेच सर्वसामान्य पाऊस पडणार आहे; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजेच 103 टक्के पाऊस होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (दि. 31) जाहीर केला. हवामान खात्याचा हा दुसरा अंदाज आहे.
नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजे मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा दुसरा अंदाज जाहीर केला. पावसाचा हा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिल्लीत झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला. हवामानशास्त्र विभागाने याआधी 14 एप्रिलला पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढविण्यात आला असून, तो 103 टक्के करण्यात आला आहे. अर्थात, त्यामध्ये चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.
1971 ते 2020 या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी 87 सें.मी. आहे. या सरासरीच्या तुलनेत पावसाच्या या चार महिन्यांत 103 टक्के पाऊस देशात पडणार आहे. देशाबरोबरच महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 103 टक्के पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागांसह पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असणार आहे, तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि विदर्भात तीन ते चार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील.
जूनमध्ये 92 ते 108 टक्के पाऊस देशात जून महिन्यात म्हणजेच पावसाच्या पहिल्या टप्प्यात 92 ते 108 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यामध्ये कमी-अधिक चार टक्के होण्याची शक्यता आहे, असेही हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. 1971 ते 2020 या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी 165.4 सें.मी. आहे. जून महिन्यात उत्तर, पश्चिम, मध्य भारत आणि दक्षिण भाग तसेच पूर्व भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारत तसेच पूर्व भारताच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यात उत्तर, पश्चिम भाग वगळता उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या खाली राहणार आहे.
भू मध्य प्रशांत महासागरात 'ला-लीना' कायम राहण्याची शक्यता आहे. तर हिंदी महासागरात आयओडीची स्थिती सर्वसामान्य राहील. या दोन्ही स्थितींचा प्रभाव देशात पडणार्या पावसावर होतो.
सांगली, पुणे, नाशिकमध्ये 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस
येत्या 4 महिन्यांत कोल्हापूर, सांगली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुष्काळी तसेच पावसावरच अवलंबून असणार्या सर्व जिल्ह्यांत तसेच संपूर्ण विदर्भातही मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. कोकण व घाटमाथा धरण क्षेत्रात तसेच जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
– माणिकराव खुळे, माजी हवामान विभागप्रमुख