कोल्हापूर ; गौरव डोंगरे : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. उद्योग, पर्यटन वाढीबरोबरच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक व्यवस्था नेटकी असणे गरजेचे असते. परंतु, कोल्हापूर जिल्ह्याला सध्या वाहतूक कोंडीने ग्रासल्याचे दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 2014 साली वाहनांची संख्या 10 लाख 58 हजार होती. आता ती संख्या 16 लाख 44 हजारांच्या घरात पोहोचली आहे. वाहने वाढली; पण वाहतुकीला शिस्त लावणारा विभाग मात्र तेवढाच राहिला. त्याचा परिणाम शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या रूपाने पाहायला मिळतो. वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता जिल्ह्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिस ठाणे मूर्त रूपात येणे गरजेचे आहे.
वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, अतिक्रमणे यामुळे जिल्ह्यात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. शहराच्या प्रवेशद्वारापासूनच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावते. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करताना उचगाव पूल, शिरोली पुलाची, सांगली फाटा, कसबा बावडा, फुलेवाडी, नवीन वाशी नाका, कळंबा या मार्गांवरील वाहतूक समस्याही दिवसागणिक वाढत चालली आहे.
मार्केट यार्ड ते रुईकर कॉलनी हा रस्ता तर अपघात क्षेत्र म्हणूनच गणला जातो. ताराराणी चौकात सिग्नल असूनही पेट्रोल पंप परिसर, अयोध्या टॉवर ते शिवाजी पार्क रस्ता आणि वटेश्वर मंदिर चौक ही वाहतूक कोंडीची केंद्रे म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. स्टेशन रोड, मध्यवर्ती बस स्थानक येथेही वाहतूक समस्या पाहायला मिळते. वाहतूक व्यवस्थेतील समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दसरा चौक, सीपीआर चौक, शिवाजी पूल, गंगावेश, रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, क्रशर चौक, संभाजीनगर, रेसकोर्स नाका, सायबर चौक, टेंबलाई उड्डाण पूल, उचगाव चौक यांना वाहतूक समस्यांनी व्यापून टाकले आहे.
आरटीओच्या एका अहवालानुसार, 2014 मध्ये दुचाकींची संख्या 8 लाख 33 हजार 588 होती ती 2021-22 मध्ये 13 लाख 11 हजार 948 वर पोहोचली आहे. ही वाढ तब्बल 4 लाख 78 हजार 360 दुचाकींची भर घालणारी आहे. याच कालावधीत चारचाकीची संख्या 61 हजारने वाढून आता ती 1 लाख 45 हजार 365 आहे. सर्व प्रकारची वाहने मिळून सध्या जिल्ह्यात 16 लाख 44 हजार इतकी संख्या झाली आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रॅक्टर, रिक्षा यांचा समावेश आहे.
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, वाढता पर्यटकांचा ओढा, वाहनांची वाढलेली संख्या यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी वाहतूक शाखा असते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यासाठीही तशी व्यवस्था हवी.
आर. आर. पाटील,
सेवानिवृत्त उपअधीक्षक