Latest

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक रंगतदार वळणावर; लोकसभा, विधानसभेची ‘लिटमस टेस्ट’

अमृता चौगुले

कोल्हापूर; संतोष पाटील : जिल्हा बँकेच्या निमित्ताने आजी-माजी मंत्री, आमदार आणि खासदार राजकीय ताकद आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेरजेचे राजकारण करीत कोणाला तरी कमबॅकची आस आहे, तर कोणाला भविष्यात एकट लढल्यास काय होऊ शकते याचा अंदाज घ्यायचा आहे. जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत भविष्यातील राजकारणाची नांदी निकालात दडली आहे. त्यामुळेच बँकेची निवडणूक भविष्यातील विधानसभा आणि लोकसभेसाठी 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांचे गगनबावडा तालुक्यातून दीर्घ कालावधीनंतर पुन्हा बँकेत आगमन झाले. बँकेसह तालुक्याच्या राजकारणात विरोधी गटच राहू नये, अशी आखणी पालकमंत्री यांनी केली होती. मात्र, विरोधी पॅनेलने पी. जी. शिंदे यांना हात दिल्याने पालकमंत्र्यांना गगनबावड्यात आपणच किंगमेकर असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. बँकेच्या निकालावरच पी. जी. गटाचे अस्तित्व अवलंबून आहे. जिल्हा बँकेत विविध गटांतील पाठीराख्यांना निवडून आणत 'गोकुळ'च्या राजकीय यशावर शिक्कामोर्तब करण्याची संधी पालकमंत्री सतेज पाटील यांना आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात आपला शब्द प्रमाण असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना बँकेच्या राजकारणात सिद्ध करावे लागणार आहे. आ. विनय कोरे यांच्या साथीने भाजपची कडवा विरोध मोडून काढण्यात मुश्रीफ यशस्वी ठरले असले तरी खा. संजय मंडलिक यांची निर्णायक साथ कायम ठेवण्यासाठी पुन्हा जोडण्या कराव्या लागतील. शिवसेनेच्या अडीच घरांच्या चालीमुळे कागलच्या राजकारणावर त्याचे प्रतिध्वनी उमटू न देण्याची कसरत हसन मुश्रीफ यांना करावी लागेल. विधानसभेचा बालेकिल्ला मजबूत करण्याच्या इराद्यानेच कागल, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यात समतोल साधत हसन मुश्रीफ यांनी शिलेदारांना पाठबळ दिले आहे.

खा. संजय मंडलिक यांनी विरोधी पॅनेल करत आपल्याच मित्रांपुढे शड्डू ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत महाडिक विरोधकांना खा. मंडलिक यांना साथ देणे अपरिहार्य आहे. तत्पूर्वी, आपण कोणाचाही कार्यकर्ता नसून, नेता असल्याचे सिद्ध करण्याची खेळी खा. मंडलिक यांनी बँकेच्या निमित्ताने केली. सोबत राहिलो तर सन्मानाने; अन्यथा माझी वाट वेगळी असेल हा प्रस्थापितांना इशारा देण्याचा प्रयत्न खा. संजय मंडलिक यांनी बँकेच्या व्यासपीठावरून दिला आहे.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यात संवादाचा सेतू बांधण्यात यशस्वी ठरलेले आ. विनय कोरे यांनी पॅनेल करताना आपली राजकीय ताकद दाखवून दिली. बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांचा पत्ता कट करून विधानसभेचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न केला. शाहूवाडी तालुक्यात राष्ट्रवादीच्या साथीने गट आणखी भक्कम करत आहेत. तर माजी आमदार सत्यजित पाटील यांनी विरोधी आघाडीच्या व्यासपीठावरून आ. कोरे यांच्यावर निशाणा साधत विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राधानगरी भुदरगड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीविरोधात लढावी लागणार असल्यानेच आ. प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रवादीला अंगावर घेतले आहे. शिरोळ तालुक्याच्या थेट राजकारणात बँकेच्या निमित्ताने गणपतराव पाटील यांनी पाऊल टाकले आहे. 'अभी नही तो कभी नही'चा नारा देत, त्यांनी अनुभव आणि ताकद पणाला लावली असून, राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याविरोधातील लढत लक्षवेधी करत पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे.

आ. राजू आवळे थेट मैदानात असल्यानेच माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर पडद्यामागे ताकदीने सूत्रे हालवत आहेत. डॉ. मिणचेकर यांनी आ. आवळे यांच्याविरोधात उत्तम कांबळे यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. जिल्हा परिषदेत एकाच व्यासपीठावर आल्यानंतर माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी बँकेच्या निमित्ताने करवीर तालुक्यातून आ. पी. एन. पाटील यांच्या संस्थात्मक बालेकिल्ल्याला धडक देण्याची तयारी केली आहे. स्मिता गवळी यांच्या उमेदवारीने पालकमंत्री सतेज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघात आ. ऋतुराज पाटील यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या दोस्तांचा नवा याराना किती पचनी पडला हे बँका आणि पतसंस्था गटातील निकालावरून स्पष्ट होणार असल्यानेच आ. प्रकाश आवाडे, अनिल पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर यांच्यातील तिरंगी लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेशी पंगा घेत माजी खासदार निवेदिता माने यांनी सत्ताधारी आघाडीसोबत राहणे पसंद केल्याने शिवसेना खा. धैर्यशील माने यांना सावध भूमिका घेणे भाग पडत आहे.

मंडलिकांचे एका दगडात अनेक पक्षी

खा. संजय मंडलिक यांनी बँकेच्या निवडणुकीत सवता सुभा मांडत एका दगडात अनेक पक्षी मारले. भाजपला कडवा विरोध केल्याचा मातोश्रीवर 'मेसेज' दिला. शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांची यानिमित्ताने मोट बांधली. गटात विभागलेली शिवसेना बँकेच्या व्यासपीठावर एकत्र आल्याचे चित्र दिसले. मार्मिक टीका करत प्रस्थापितांनी आपणास हलक्यात घेऊ नये, असा पद्धतशीर इशारा दिला. भविष्यातील राजकारणात भाजप आणि महाडिकांना रोखण्यासाठी खा. मंडलिक ही दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांची अपरिहार्यता असणार आहे. परंतु, आपले स्वतंत्र अस्तित्व यानिमित्ताने खा. मंडलिक यांनी दाखवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT