कोल्हापूर; संतोष पाटील : सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करून द्यावेत, असा सूर असला, तरी प्रमुख नेते मंडळी अर्ज दाखल करतानाच हबकी डाव टाकत बिनविरोधाची वाटचाल घट्ट करत आहेत. लढत होण्याची शक्यता असलेल्या आठ ते दहा जागांवर चर्चा आणि वाटाघाटीतून मार्ग काढला जाईल. बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) चाव्या महाविकास आघाडीच्या हातातच राहणार असल्याने काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय पुढे येणार आहे. यातून तेढ वाढणार की तिढा सुटणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडीत असलेल्या आवाडे गटाकडून इतर मागासवर्गीय गटातून विलास गाताडे निवडून आले होते. बँक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असताना आ. प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी आ. विनय कोरे आणि आ. पी. एन. पाटील यांच्यावर आहे. मात्र, काहींच्या सूचनेनुसार आणि बँकेचे हित पाहून स्वत: मैदानात उतरत असल्याचे आ. आवाडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आ. विनय कोरे यांचा प्रक्रिया गटातील संचालक बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांच्या विरोधासह एकूण तीन जागांची मागणी आहे. प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक हे दुसरे संचालक आहेत. आ. आवाडे यांनी प्रक्रिया गटातून एक उमेदवारी दाखल केली आहे. पतसंस्था गटातून प्रा. जयंत पाटील यांच्यासाठी आ. विनय कोरे आग्रही राहण्याची शक्यता आहे. पतसंस्था गटातून आ. आवाडे यांनी दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खा. संजय मंडलिक आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह शिवसेना अजून दोन जागांवर आग्रही आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका जागेची मागणी केली आहे. विरोधातून निवडून आलेले अशोक चराटी आणि अनिल पाटील यांनी यंदाही जोरदार तयारी केली आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्जेराव पाटील आणि मानसिंग गायकवाड यांच्यात रंगतदार लढतीत दोन मतांनी विजयाचे पारडे फिरले होते. गायकवाड आणि पाटील पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर दाखल होणारे उमेदवारी अर्ज आणि त्यानिमित्ताने होणारे शक्तिप्रदर्शन हे पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत असल्याचे सूचित करत आहेत.
विकास सेवा गटातील चार जागा, पतसंस्था, महिला, ओबीसी, मार्केटिंग प्रोसेसिंग गटातील प्रत्येकी एक अशा आठ जागांचा तिढा सोडवण्याचे आव्हान सत्ताधारी आघाडीपुढे आहे.
आतापर्यंतचे दावेदार
सेवा संस्था गट :
कागल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
गगनबावडा : पालकमंत्री सतेज पाटील
भुदरगड : के. पी. पाटील
राधानगरी : ए. वाय.पाटील
हातकणंगले : महादेवराव महाडिक
पन्हाळा : आ. विनय कोरे
शिरोळ : राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर आणि गणपतराव पाटील
शाहुवाडी : सर्जेराव पाटील पेरीडकर आणि मानसिंग गायकवाड
राधानगरी : ए. वाय. पाटील
आजरा : अशोक चराटी
चंदगड : आ. राजेश पाटील
गडहिंग्लज : संतोष पाटील
महिला प्रतिनिधी : निवेदिता माने, उदयानी साळुंखे, सौ. शिंदे, गंधालीदेवी कुपेकर
प्रक्रिया गट : खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील-असुर्लेकर, प्रदीप पाटील-भुयेकर
पतसंस्था गट : आ. प्रकाश आवाडे, अनिल पाटील, प्रा. जयंत पाटील
अनुसूचित जाती गट : आ. राजू आवळे
इतर शेती संस्था गट : भैया माने
विशेष मागास प्रवर्ग : आर. के. पोवार.