कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष शिवसेनेमुळेच, गोकुळमध्ये परिवर्तन शिवसनेमुळेच, त्यामुळे जिल्हा बँकेचा ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) अध्यक्षही यापुढे शिवसेनाच ठरवेल, असे सांगून खा. संजय मंडलिक यांनी या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे सर्व नऊ उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेने माघार घेतल्यामुळेच आपण बिनविरोध निवडून आला आहात. त्यामुळे बिनविरोधची टिमकी न वाजविता माणुसकी असेल तर केलेल्या मदतीची परतफेड करा, असे आवाहनही त्यांनी केले.
मंडलिक म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) पॅनेल करण्याच्या निर्णयाचे सहकारातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी स्वागत केले. आम्ही सर्व साखर कारखान्यांना मदत केली, असे विरोधक सांगत आहेत. मग आजरा व गडहिंग्लज साखर कारखाने का बंद पडले. लोकवर्गणीतून गडहिंग्लज साखर कारखाना सुरू करण्याची भूमिका तेथील गावकर्यांना का घ्यावी लागली, याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळेच सहा जागांच्या निवडी बिनविरोध झाल्या. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्यांनी टिमकी वाजवू नये. शिवसेनेला डावलून कोणी अध्यक्ष होऊ शकणार नाही, असेही खा. मंडलिक म्हणाले.
खपवून घेणार नाही ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )
राज्याच्या राजकारणात आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मान्यच असेल. परंतु, शिवसेनेला कोणी वापरून फेकून देत असतील तर ते खपवून घेणार नाही. यासदंर्भात शिवसेना नेत्यांना आम्ही पटवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
माजी आ. चंद्रदीप नरके म्हणाले, जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष कोणामुळे झाला. गोकुळच्या निवडणुकीत परिवर्तन कोणामुळे झाले याचे आत्मचिंतन सत्ताधारी नेत्यांनी करावे.
पायालाच राजकारण; जोडे काढून काय उपयोग ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )
संपतराव पवार-पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचा कारभार चांगला आहे; परंतु त्यामध्ये उणिवा नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. पायातील जोडे बाहेर काढून सहकारात येता; पण त्यांच्या पायालाच राजाकरण लागले, त्याचे काय करणार.
आ. कोरे यांनी उत्तर द्यावे
सत्ताधारी मंडळीतील काहीजण आता फार तत्त्वज्ञान सांगू लागले आहेत. ऐकताना आपण पारायणास बसलो आहोत की काय, असे वाटते. बँकेचे विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्यासाठी पॅनेल कोणी फोडले, याचे उत्तर आ. विनय कोरे यांनी द्यावे, असे आ. प्रकाश आबिटकर म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सुरेश कुराडे, अजित नरके आदी उपस्थित होते.
वापरा आणि फेका संस्कृती
पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा होत्या. परंतु, 'वापरा आणि फेका'अशी त्यांची संस्कृती आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर कोणाच्या उमेदवारीला आपण आळा घालू शकतो, असे समजणार्या प्रवृत्तींना छेद द्यायचे काम आम्ही केल्याचे माजी आ. नरके म्हणाले.
सत्ताधार्यांच्या पायाखालची वाळू सरकली
तालुकानिहाय मतमोजणीचा घाट सत्ताधारी घालत आहेत. त्यासाठी शासकीय यंत्रणेवर ते दबाव आणत आहेत. त्यामुळे गोपनीयता राहणार नाही. राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्याला आम्ही हरकत घेतली. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्यांना पत्र दिले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी खुल्या वातावरणात एकत्र व्हावी, असे आ. प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.