Latest

कोल्हापूर : चित्र-शिल्पातून लोकराजा शाहूंना मानवंदना

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
चित्र आणि शिल्पकलेच्या आविष्काराने रविवारी लोकराजा राजर्षी शाहूंना अनोखी मानवंदना देण्यात आली. एक-दोन नव्हे, तर तब्बल 130 कलाकारांनी राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित लोकराजा कृतज्ञता पर्वांत कलासाधना केली. शाहू मिल येथे हे प्रदर्शन चार दिवस पाहता येणार आहे.

शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एकाच छताखाली हे सर्व कलाकार एकत्र आले. कलेचा आश्रयदाता, लोकनायकाला या अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहताना कलाकारांचा उत्साह अधिक जाणवत होता. कधी काळी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबुराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. यार मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून 'कोल्हापूर स्कूल' अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केली. या कलेचा जागर अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने या सर्व कलाकारांनी एकत्र येत कलेच्याच माध्यमातून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ व नामवंत चित्रकार, शिल्पकारांसह 130 कलाकार या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रवीण गायकवाड, शिरीष बिवलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 'कॅमल'सह दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कला निकेतन कला महाविद्यालय, कला मंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाऊंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंग बहार, कलासाधना आदींच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम झाला. या उपक्रमानंतर नागरिकांसाठी या चित्राचे प्रदर्शन, कृतज्ञता पर्वात शाहू मिल परिसरात आणखी चार दिवस पाहता येणार आहे. याप्रसंगी नंदकुमार गायकवाड, जयप्रकाश ताजणे, दिलीप घेवारी, सिद्धार्थ लांडगे, रंजित चौगुले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते.

अबालवृद्धांचा सहभाग

या उपक्रमात वयाची 85 वर्षे पूर्ण करणार्‍या आणि अभिजात चित्रकलेमध्ये पीएच. डी. मिळवणार्‍या डॉ. नलिनी भागवत यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वयाची केवळ 6 वर्षे पूर्ण असणार्‍या यज्ञेश किरण टाकळकर या बालकाने रेखाटलेल्या चित्राचे जिल्हाधिकार्‍यांनी कौतुक केले. शाडू कामाद्वारे बनविलेल्या शाहू महाराजांच्या प्रतिमांचे शिल्पकारांकडून प्रेक्षकांना मनोहारी दर्शन यानिमित्ताने घडवण्यात आले. होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT