कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतींसाठी चुरशीने झालेल्या मतदानानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. चौकाचौकांत रात्री जागू लागल्या आहेत. मंगळवारी (दि. 20) गुलाल कुणाला, याचा फैसला होणार आहे. सकाळी 10 वाजता पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी रविवारी अत्यंत चुरशीने 84.14 टक्के मतदान झाले होते. विशेषतः, सर्वच पक्षांनी सरपंचपदावर 'फोकस' केल्यामुळे काही गावांमध्ये जिल्हास्तरीय यंत्रणा ग्रामीण भागात कामाला लागली होती. चुरशीने झालेल्या निवडणुकीत अनेक गावांत तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर आक्रमक कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी गावपुढार्यांचा कस लागणार आहे. तसेच तालुक्यातील संपूर्ण गावांतील निकाल त्या-त्या तालुक्यांतील इमारतींमध्ये असल्यामुळे मोठे पोलिसबळ तैनात करण्यात आले आहे.
धाकधूक अन् विश्वासही
बहुतांशी गावांमध्ये अत्यंत अटी-तटीने निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत; तरीही अनपेक्षित निकालाचीही धाकधूक आहे. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीकडे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदानानंतर अनेक उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरणार की अपेक्षाभंग होणार, हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.