कोल्हापूर ; सतीश सरीकर : डिझेल दरवाढ, वडापची समांतर यंत्रणा, कर्मचार्यांची उदासिनता, अधिकार्यांचे दुर्लक्ष आदी कारणांनी कोल्हापूरची लाईफलाईन असलेली केएमटी मोडकळीस आली आहे. परिणामी, प्रशासनाने केएमटीला उर्जितावस्था आणण्यासाठी तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिका प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे प्रवाशांना तिकीट दरवाढीची आणखी झळ बसणार आहे.
कोल्हापूर शहर व परिसरातील सुमारे लाखाहून जास्त प्रवाशांना केएमटी हे अल्पदरात नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हक्काचे सार्वजनिक वाहन आहे. शाळा-महाविद्यालयांसाठीही रोज पाच हजारांहून जास्त विद्यार्थी केएमटीनेच ये-जा करतात. लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत बसेसची संख्या निम्यावर आली आहे. प्रवाशांची संख्याही घटून सुमारे साठ हजारांच्या जवळपास आहे, तरीही केएमटीच्या बसेस फुल्ल भरून जाताना दिसतात. गर्दी वाढली असली, तरी काही तोट्याच्या मार्गामुळे आर्थिक फटका बसत
आहे.
दोन वर्षांपूर्वी 120 पैकी 105 बसेस रस्त्यावर धावत होत्या; परंतु लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केएमटी ठप्प झाली. कालांतराने 2-4 बसेस करत आता 60 बसेस शहर व परिसरातील विविध 25 मार्गांवर आहेत. सुमारे साठ हजारहून अधिक प्रवासी क्षमता आहे. त्यातून केएमटीच्या तिजोरीत रोज सुमारे साडेपाच लाख जमा होतात; परंतु ना नफा ना तोटा तत्त्वानुसार चालणार्या केएमटीला रोज सुमारे अडीच लाख रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
परिणामी, 750 कर्मचार्यांच्या पगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये तिकीट दरवाढ झालेली होती. त्यावेळी डिझेलचा दर 72 रु. होता. आता डिझेलचा दर सुमारे 100 रुपयापर्यंत गेला आहे. डिझेलसह पगार व इतर खर्चासाठी केएमटीला 2018 मध्ये रोज सुमारे 13 लाख खर्च येत होता. आता हाच खर्च 15 लाखांच्यावर गेला आहे.
दरवाढीशिवाय पर्याय नाही : आडसूळ
एसटी व खासगी वाहतुकीच्या तुलनेत केएमटीचे दर खूप कमी आहेत. केएमटीच्या तिकीट दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. त्यानुसार केएमटी प्रशासनाने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली.
तिकीट दरवाढीचा प्रस्ताव असा…
सध्याचा दर प्रस्तावित दर
8 10
10 15
10 20
12 22
14 24
16 25
18 26
20 27
22 28
24 29
26 30
त्यापुढे प्रत्येक स्टेजसाठी 4 रु. दरवाढ, आता दरवाढीनंतर
एकदिवसीय पास 35 50
साप्ताहिक पास 150 300
पाक्षिक पास 400 600
मासिक पास 740 1070
त्रैमासिक पास 2050 2950