कोल्हापूर ; दिलीप भिसे : मुंबई- पुण्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात पोलिसांना चकवा देत पसार झालेल्या आणि गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील संघटित टोळ्यांनी शहर, ग्रामीण भागात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. परप्रांतीय गुंडांच्या दहशतीमुळे स्थानिक रहिवाशी, व्यापारी, व्यावसायिकही हतबल झाले आहेत. स्थानिक गुंडांच्या मदतीने म्होरक्यांचा शहर, महामार्गावरील छुपा आश्रय भविष्यात सार्यांनाच डोकेदुःखीचा ठरणारा आहे.
मध्य प्रदेशातील मुकेश मसाण्यासह त्याच्या टोळीने दोन दिवसांपूर्वी जवाहरनगर परिसरात थरारनाट्य घडविले. चोरीच्या उद्देशाने आलेल्या टोळीला मिरजकर कुटुंबीयांनी प्रखर विरोध केला; मात्र दहशत माजविण्यासाठी चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत मुलीसह दोघेजण जखमी झाले. पोलिसांनी नाकाबंदी करून टोळीला बेड्या ठोकल्या.
या घटनेला काही अवधी होण्यापूर्वीच गुजरातमधील बजरंगे टोळीने गुजरीतील सराफ व्यावसायिकाचा पाठलाग करून त्यांच्या मोपेडच्या डिक्कीतील दागिने हातोहात लंपास केले. राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तिघांना अटक केली; मात्र म्होरक्या मुद्देमालासह पसार झाला. परप्रांतीय टोळ्यांच्या कारनाम्यांमुळे पोलिस यंत्रणा चक्रावली आहे. पोलिसांची रात्रं-दिवस नाकेबंदी आणि संशयास्पद वाहनांची कडक तपासणी होत असताना आंतरराज्य टोळ्यांचा शिरकाव होतोच कसा, हा सामान्यांचा सवाल आहे.
गँगस्टर गुर्जरचा स्थानिक पाठीराखा कोण?
मुंबई, पुण्यासह राजस्थान, दिल्ली, हरियाणासह पंजाब पोलिसांना चकवा देत पसार झालेल्या पन्नासावर कुख्यात गुंड, आंतरराष्ट्रीय तस्करी टोळ्यांच्या म्होरक्यांना कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकून जेरबंद केले आहे. दीड वर्षापूर्वी राजस्थानातील गँगस्टर विक्रम गुर्जर ऊर्फ पपल्या याला राजस्थान कंमाडोज पथकाने कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने सरनोबतवाडी (ता. करवीर) येथे अटक केली होती. यावेळी त्याच्यासमवेत सातारा येथील जिया नामक तरुणीचेही वास्तव्य होते. पोलिसांनी तिलाही अटक केली होती.
कुख्यात गुंडांची वर्दळ धोक्याची ठरू शकते
राजस्थानासह अन्य राज्यांत गुन्हेगारी कारनाम्याचे रेकॉर्ड असताना सराईत गुंड सरनोबतवाडी परिसरात कोणाच्या आधाराने आश्रयाला आला, हे कोडे अजूनही उलगडले नाही. महामार्गालगत असलेल्या गोकुळ शिरगाव, गांधीनगर व शिरोली पुलाची परिसरात मोस्ट वाँटेड गुंडांची सतत वर्दळ असते. हा वावर भविष्यात धोकादायक ठरू शकतो.
रोजगारीचे साधन
जून- जुलैमध्ये जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणने 18 ते 22 वयोगटातील तरुणांना अटक केली होती. राजवाडा पोलिसांनी अटक केलेल्या 6 जणांची कोरोना काळात नोकरी गेल्याने वाहनचोरीचा मार्ग पत्करल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. ' एलसीबी'ने जेरबंद केलेल्या तरुणांनी महामार्गावर केलेल्या लुटमारीच्या 11 गुन्ह्यांची कबुली दिली होती. 19 ते 25 वयोगटातील संशयितांनी रोजगारीचे साधन म्हणून लुटमारीचा धंदा सुरू केला होता. टोळीने अधूनमधून चेनस्नॅचिंगसह घरफोडीतून सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचेही कबुली दिली होती.
वाहन, मोबाईल चोरी, चेनस्नॅचिंगमध्ये तरुणांचा सहभाग
शहर, ग्रामीण भागात अलीकडच्या काळात वाहन, महागड्या मोबाईलची चोरी व चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांतही 17 ते 25 वयोगटातील उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. मुबलक कमाई देणार्या दारू व गुटखा तस्करीतही तरुणांचा वापर सुरू झाला आहे. अवैध व्यवसायांत गुरफटलेल्या तरुणांना विनासायास मुबलक कमाईची चटक लागली आहे. आर्थिक लाभासाठी ही मुले कुख्यात आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कात राहू लागली आहेत.
आंतरराष्ट्रीय गँगस्टरचा खुलेआम वावर
लॉरेन्स विष्णोईसह कॅनडास्थित गोल्डी ब—ार टोळीशी लागेबांधे असलेल्या आणि पंजाब, हरियाणा, गुजरातमध्ये प्रचंड दहशत निर्माण केलेल्या हरियाणातील कुख्यात गँगस्टर मोहित ऊर्फ शेरा जगबीरसिंग मलिक (वय 30, रा. बिधल, ता. गोहाना) याचा अलीकडच्या काळात कोल्हापूर शहरात खुलेआम वावर होता. भाविक, पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेल्या रंकाळा टॉवर परिसरात भाड्याच्या खोलीत त्याने आश्रय घेतला होता.
पोलिस आश्रयदात्यांचा पर्दाफाश करणार का?
अत्यंत धोकादायक आणि गोळीबार करण्यात सराईत असलेल्या गँगस्टर कोणाच्या आश्रयाने कोल्हापुरात आला? त्याचे साथीदार कोण, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्लेसह पथकाने त्याला बेड्या ठोकून हरियाणा, पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले. कुख्यात गँगस्टरचा रंकाळा टॉवर परिसरात सकाळ, सायंकाळी मुक्त संचार होता. मोहित ऊर्फ शेरा मलिक याच्या संपर्कात आलेल्या स्थानिकांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे.