कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : कसबा बावड्यात शुक्रवारी अनंत चतुर्दशीला पारंपरीक वाद्यांसह डीजेच्या गजरात श्रीगणेशाचे विसर्जन मिरवणुका पार पडल्या. यानंतर विधिवत पूजा, आरती करून सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती कोल्हापूर महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीदानाला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. कसबा बावडा, लाईन बाजार परिसरातील एकशे सोळा मूर्ती दान करण्यात आल्या. पहाटे चार वाजता शेवटची मूर्ती दान करण्यात आली.
यावर्षी कसबा बावडा परिसरामध्ये देखाव्यांना मोठा प्रतिसाद लाभला. ५ सप्टेंबरपासून देखावे पाहण्यासाठी खुले झाल्यानंतर ९ सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजेपर्यंत देखावे पाहण्यासाठी खुले होते. पंचगंगा प्रदूषणाच्या निमित्ताने घरगुती गौरी-गणपती दान करावेत, पंचगंगा नदीमध्ये गणपती विसर्जित करू नका, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कोल्हापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रबोधन करण्यात आले होते. याला शंभर टक्के प्रतिसाद लाभला.
राजाराम बंधारा येथे पंचगंगा घाटावर पोलिस बंदोबस्त होता या ठिकाणी मंडळांनी दान केलेल्या मूर्तींची नोंद करण्यात येत होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दान केलेल्या मूर्ती घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सहा नंतर कसबा बावडा येथील मुख्य मार्गावर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, अनेक मंडळांनी यावेळी मिरवणुकीमध्ये डीजे आणले होते. पिंजार गल्ली कला क्रीडा मंडळ, सम्राट मित्र मंडळ यांनी टाळ मृदंगाच्या निनादात पालखीतून गणेश विसर्जन केले.
भारतवीर मित्र मंडळाने विसर्जन मिरवणुकीत झांज पथक आणले होते. छ. शिवाजीराजे तरुण मंडळ, पाटील गल्ली यांनी विसर्जनासाठी पारंपारिक वाद्याचा अवलंब केला. राजाराम बंधारा येथे मंडळांनी दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून विधिवत पूजा करत मूर्ती दान केल्या. पहाटे चार वाजता छावा मित्र मंडळ यांची शेवटची मूर्ती दान करण्यात आली. दरम्यान, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉ. डी. वाय. पाटील ट्रस्टच्या वतीने मंडळाच्या कार्यकर्त्यांना खिचडी प्रसाद वाटप राजाराम बंधारा येथे करण्यात आले. याचा लाभ सुमारे आठ हजार गणेश भक्तांनी घेतला. या ठिकाणी रात्री आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी सदिच्छा भेट देत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.