कोल्हापूर, प्रवीण मस्के : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा सरसकट बंद करण्यात येणार नाहीत; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 0 ते 20 पटापर्यंतच्या 432 शाळांतील पटसंख्या टिकविण्याचे आगामी काळात आव्हान असणार आहे. अशा शाळांचे समायोजन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. यंदाच्या वर्षी शाळा नियमित वेळेत सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार अशी शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या बहुतांश शाळा ग्रामीण, दुर्गम भागातील आहेत. 'आरटीई' कायद्यानुसार विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटरवर पहिली ते पाचवी व तीन किलोमीटर अंतरावर सहावी ते आठवीचे वर्ग असणे बंधनकारक आहे.
प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शाळांमधील विद्यार्थी संख्येचा आढावा घेतला जात आहे. यात 0 ते 20 पटापर्यंतच्या सर्वाधिक 92 शाळा शाहूवाडी तालुक्यात आहेत. आजरा (43), चंदगड (56), भुदरगड (58) तालुक्यात कमी पटसंख्येच्या शाळा आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळा या दुर्गम भागातील असून याठिकाणी जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाहीत. वाहन सुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंदचा निर्णय झाल्यास गोरगरीब, वंचित, दुर्गम भागातील मुलांचे शिक्षण संपुष्टात येण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुली शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कसे?
राज्यात कमी पटसंख्येच्या सुमारे 4 हजार 800 हून अधिक शाळा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 0 ते 5 पटसंख्या शाळा (46), 6 ते 10 पटसंख्या (98), 11 ते 15 पटसंख्या (176), 16 ते 20 (112) असे मिळून 432 कमी पटाच्या शाळा आहेत. 159 शाळापर्यंत वाहने पोहोचत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.