कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची उद्या, शनिवारी राजाराम तलावजवळील शासकीय गोदामात मतमोजणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. मतमोजणी परिसरासह शहरात कडेकोट बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. या काळात हुल्लडबाजी करणार्यांवर कठोर कारवाईच्या सक्त सूचना प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.
शहरातील बिंदू चौक, दसरा चौक, टिंबर मार्केट, गंजीमाळसह सिद्धार्थनगर, कनाननगर, कसबा बावडा, शाहूपुरी, सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, भोसलेवाडीसह संवेदनशील भागांत पोलिसांचा मोठा फौजफाटा नियुक्त करण्यात आला आहे.
मतमोजणीनंतर मध्यवर्ती चौक, शहरांतर्गत सर्व मार्गांवर नाकाबंदी, ठिकठिकाणी फिक्स पॉईंटही नियुक्त करण्यात आले आहेत. शहराला जोडणार्या सर्व प्रवेशमार्गांवरही वाहनांची तपासणी करण्यात येईल. हुल्लडबाजी करणार्या, पुंगळ्या काढून भरधाव वाहने हाकणार्यांविरुद्धही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरीतील प्रभारी अधिकार्यांशी संपर्क साधून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याच्या प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक – 1,
पोलिस उपअधीक्षक – 2, पोलिस निरीक्षक – 6, सहायक निरीक्षक – 10, पोलिस – 130, होमगार्ड – 100, राज्य राखीव दल – 1, केंद्रीय सुरक्षा – 2, जलद कृतिदल – 1 अशी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
प्रतिस्पर्धी गटांचे समर्थक एकत्र येऊ नयेत, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, समर्थक सरनोबतवाडी येथील एच. पी. गोदाम परिसरात थांबतील, तर भाजपचे कार्यकर्ते, समर्थक शिवाजी विद्यापीठजवळील युथ बँकेसमोर थांबणार आहेत.