Latest

कोल्हापूर : ‘ऑक्ट नाईन’ फसवणूक; आणखी दोघे गजाआड

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के बोनस आणि दीड वर्षानंतर मूळ रक्कम परत देण्याच्या आमिषाने शहर व जिल्ह्यासह सीमा भागातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या संशयावरून ऑक्ट नाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन कंपनीच्या कृष्णात नंदा चौगुले (रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) व नामदेव विठ्ठल माळी (मणेर मळा, उचगाव, ता. करवीर) या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. ते चॅनल पार्टनर व डायरेक्टर आहेत.

संशयित दोघांना मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मुख्य संशयित अभिजित नागावकर याची पोलिस कोठडी बुधवार, दि. 14 पर्यंत वाढविण्यात आली आहे. संशयितांच्या घराची झडती घेतल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. संशयितांसह कर्मचार्‍यांकडेही चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डायरेक्टर नामदेव माळीने आठवड्यापूर्वी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

राजारामपुरीत थाटले कार्यालय!

अभिजित जोती नागावकर (रा. अयोध्या पार्क, कोल्हापूर) याच्यासह त्याचे साथीदार गुंतवणूकदारांना एक कोटी 76 लाखांना गंडा घालून पसार झाले होते. राजारामपुरी येथील सरूडकर फ्लॅटमध्ये त्यांनी कार्यालय थाटले होते.

तगादा वाढला, कार्यालयाला टाळे

संशयिताच्या आमिषाला बळी पडून उद्योग व्यावसायिक, कारखानदारांसह विविध घटकांतील मंडळींनी लाखो रुपये कंपनीत गुंतवले होते. मुदतीनंतर बोनससह मूळ रक्कम मिळण्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा वाढल्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकून संशयित पसार झाले होते.

गुंतवणूकदारांनी पुढे यावे : ओमासे यांचे आवाहन

ऑक्ट नाईन कंपनीच्या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. शिवाय फसवणूक झालेल्या रकमेचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी संशयिताविरुद्ध तक्रारीसाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन ईश्वर ओमासे यांनी केले आहे. संशयितांनी आजवर 70 पेक्षा अधिक जणांची 1 कोटी 76 लाख 80 हजाराची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT