कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिन्यापासून तळ्यात-मळ्यात सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अचूक वेळ साधत पंचगंगातीरी झालेल्या कार्यक्रमाला लावलेली हजेरी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. याच कार्यक्रमास उपस्थिती लावत शिवसेनेचे माजी आ. चंद्रदीप नरके यांनीही भविष्यात शिंदे गटासोबत राहणार असल्याचे संकेत दिले.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद व गट वाढविण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. आमदारांबरोबरच शिवसेनेचे खासदार, माजी आमदार, खासदार व पदाधिकार्यांना देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून फोडण्यास सुरुवात केली. परंतु काही पदाधिकारी सावधपणाची भूमिका घेत राहिले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर कोल्हापुरातील आ. प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्री शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजय मंडलिक व धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटात गेले. मात्र शिवसेनेचे विजय देवणे, मुरलीधर जाधव, संजय पवार या तीनही जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. याशिवाय माजी आ. उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर हे देखील ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राहिले. माजी आ. चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर हे मात्र लपंडाव खेळत होते. परंतु काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे कोल्हापूर दौर्यावर आल्या होत्या. त्यांच्या दौर्यात डॉ. सुजित मिणचेकर यांची भूमिका स्पष्ट झाली. माजी आ. चंद्रदीप नरके मात्र दोन्ही गटाच्या कार्यक्रमापासून तसे थोडे अंतर ठेवूनच राहात होते. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौर्यात मात्र त्यांनी लावलेल्या उपस्थितीमुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाल्याचे बोलले जाते.
सध्या मी कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आहे. आपण आपली राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे माजी आ. चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी निमंत्रण दिले होते. त्यामुळे आपण या कार्यक्रमास उपस्थित राहिलो, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले.
बंडाची चर्चा रंगणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील बंडाच्या पवित्र्यात असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांचाच आग्रह होता. खा. संजय मंडलिक यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांनी भेटही घेतल्याची चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढली. ते पक्षातच राहतील, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले. मात्र ए. वाय. पाटील यांनी याबाबत कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळे पाटील यांच्या बंडाची चर्चा थांबते न थांबते तोच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अचूक वेळ साधत व्यासपीठावरील त्यांनी लावलेल्या हजेरीमुळे पुन्हा त्यांच्या बंडाची चर्चा रंगणार आहे.