कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : कोल्हापूर येथील नियोजित आयटी पार्क आता द़ृष्टिक्षेपात आला आहे. त्यासाठी कोल्हापूर महापालिकेची टेंबलाईवाडी येथील तयार इमारत 'पीपीपी' तत्त्वावर देण्यात येणार आहे. एकूण चार जागा आयटी पार्कसाठी राखीव असून, त्यापैकी वरील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित आयटी पार्कचा मार्ग खुला झाला आहे.
कोल्हापूरला आयटी पार्क सुरू करण्याची मागणी आहे. आता टेंबलाईवाडी येथे आयटी पार्क सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. 15 हजार 120 चौरस मीटरचे क्षेत्र त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 'पीपीपी' तत्त्वावर ही इमारत दिली जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूकही तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली आहे.
केवळ आयटी पार्ककरिताच एकूण 12 हजार 900 चौरस मीटरचा भूखंड निश्चित करण्यात आला आहे, तर टिंबर मार्केट येथे आरक्षणाखाली असलेली व ताब्यात असलेली 1 हजार 367 चौरस मीटर व ताब्यात नसलेली 4 हजार 876 चौरस मीटर जागा आरक्षित आहे. आयआरबीसाठी जी जागा देण्यात आली होती, त्या जागेवर आयआरबीने हॉटेलसाठी बांधकाम केले आहे. ही जागा आयटी पार्कसाठी देण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील सुमारे सव्वा ते दीड लाख युवक-युवती देश आणि परदेशात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुसंख्य युवक-युवती पुणे, बंगळूर व हैदराबाद येथे असून, कोल्हापुरात आयटी पार्क सुरू झाल्यास त्यांना स्थानिक पातळीवर संधी मिळून कोल्हापूरच्या प्रगतीला हातभार लागणार आहे.
कोल्हापूर हवाईसेवेने आता बंगळूर, हैदराबादबरोबरच मुंबईशी जोडले जात आहे. हवाईसेवेच्या विस्ताराने कनेक्टिव्हिटी वाढली असून, त्याचा फायदा कोल्हापूरच्या आयटी पार्कला होणार आहे. रेल्वे सेवाही विस्तारली आहे. त्याचाही फायदा आयटी क्षेत्राला होणार आहे. कोल्हापूर हे पुणे, गोवा, मुंबई, बंगळूर, हैदराबाद या आंतरराष्ट्रीय विमानतळांपासून जवळच्या अंतरावर आहे.
या सर्व शहरांशी कोल्हापूर महामार्गाने जोडले गेले आहे. त्याचबरोबर जयगड ते विशाखापट्टणम महामार्ग आणि अहमदाबाद ते बंगळूर या इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या मध्यभागी कोल्हापूर येत असून, त्याचा फायदा या आयटी पार्कला होणार असल्याचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष ओंकार देशपांडे यांनी सांगितले. कोल्हापुरातील सुमारे दीड लाख युवक-युवती या क्षेत्रात असून, कोल्हापुरातील आयटी पार्कचा त्यांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
* महापालिका 15 हजार 120 चौरस मीटर जागा देणार
* कोल्हापूरचे दीड लाख युवक-युवती आयटीत कार्यरत
* आंतरराष्ट्रीय विमानतळांशी कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी
* महानगरांशी कोल्हापूर कनेक्टला आणखी वाव