कोल्हापूर ; अनिल देशमुख : रेशनवरून देण्यात येणारा गहू कमी करण्यात आला आहे. नियतन (प्रमाण) बदलल्याने जिल्ह्यात दरमहा 1 हजार 650 मेट्रिक टन गहू रेशनवरून कमी झाला आहे. तितकेच तांदळाचे प्रमाण मात्र वाढवण्यात आले आहे. यामुळे नुसता भातच खा, अशी कार्डधारकांची स्थिती झाली आहे.
कोरोना कालावधीपासून प्रधानमंत्री मोफत धान्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 50 हजार लाभार्थ्यांना दरमहा तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जात आहे. या नियतनात (प्रमाण) बदल करण्यात आला आहे. नव्या नियतनानुसार या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा एकच किलो गहू देण्यात येणार असून, चार किलो तांदूळ दिला जाणार आहे.
प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा 2 रुपये प्रतिकिलो दराने तीन किलो गहू आणि तीन रुपये प्रतिकिलो दराने दोन किलो तांदूळ दिला जात होता. या नियतनातही बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आता तीनऐवजी दोन किलो गहू देण्यात येत असून, दोनऐवजी तीन किलो तांदूळ दिला जात आहे.
या दोन्ही योजनांतर्गत मिळणार्या एकूण सहा किलो गहू कमी होऊन तो आता तीनच किलो दिला जात आहे. याउलट चार किलो तांदळाऐवजी आता रेशनवरून सात किलो तांदूळ मिळणार आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारला धान्य खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी झाल्याने रेशनवरून सध्या तांदळाचे प्रमाण वाढल्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती प्रशासनाकडे नसल्याचे सांगण्यात आले.
रेशनवरील तांदूळ व्यापार्यांच्या घशात
रेशनवरून स्वस्तात आणि कोरोना कालावधीपासून मोफत मिळणारा तांदूळ व्यापार्यांच्याच घशात जात आहे. गावोगावी फिरून रेशनवरून मिळालेला हा तांदूळ व्यापारी खरेदी करत आहेत. जिल्ह्यात सुमारे 3 हजार 850 मेट्रिक टन तांदळाचे वाटप होते, त्यापैकी सुमारे 3 हजार टन तांदूळ हा व्यापार्यांना विक्री होत असल्याचे वास्तव आहे. प्रशासनाच्या अपुर्या यंत्रणेमुळे या प्रकारावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे, याचा फायदा घेत रेशनवरील हा तांदूळ इडलीसारखे विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी खुला बाजारात वापरला जात आहे. जिल्हा प्रशासनाने असा तांदूळ खरेदी करणार्या दोघांवर कारवाई केली होती. तरीही असा तांदूळ खरेदी-विक्रीचा प्रकार गावोगावी जोरात सुरूच आहे.
व्यापार्यांसाठी तांदळाचे प्रमाण वाढवले का?
रेशनवरील हा तांदूळ व्यापारी घरोघरी येऊन विकत घेऊन जातात. असा तांदूळ खरेदी करणारे टेम्पो, छोटे ट्रक, रिक्षा गावागावांतून फिरतच असतात. अशा व्यापार्यांसाठीच तांदळाचे प्रमाण वाढवले का, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात भाताबरोबर चपाती खाण्याचेही प्रमाण मोठे आहे. यामुळे तांदळाच्या तुलनेत गहू कमी मिळत असल्याने आता नुसता भातच खावा, अशी काही धारणा आहे का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित होत आहे.