Latest

कोल्हापूर : आगामी हंगामात साखर उद्योगाची सुगी?

Arun Patil

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : गेल्या दोन वर्षांपाठोपाठ भारतीय साखर कारखानदारीला आगामी हंगामात सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. जागतिक बाजारामध्ये क्रूड ऑईलच्या दराचा भडका उडाल्यामुळे जगातील साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या ब्राझिलने साखर निर्यातीचे करार रद्द करून इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जागतिक बाजारात आगामी काळात साखरेची टंचाई निर्माण होऊन भारतीय साखर उद्योगाला निर्यातीसाठी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, अशी आंतरराष्ट्रीय साखर बाजारात चर्चा आहे.

देशात चालू हंगामात देशातील साखर उत्पादनाने 350 लाख मेट्रिक टनाचा टप्पा गाठला. महाराष्ट्रातही 135 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला. साखर निर्यात वर्ष संपण्यास तब्बल 7 महिन्यांचा कालावधी असताना भारताने कोणत्याही सरकारी निर्यात अनुदानाशिवाय आजअखेर 70 लाख मेट्रिक टन साखर जागतिक बाजारात निर्यात केली आहे.

वर्षअखेरीस निर्यातीचा आकडा 85 ते 90 लाख मेट्रिक टनाच्या जवळ पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. किंबहुना यामुळे देशातील साखर कारखान्यांना उत्पादकांची एफआरपी प्रमाणे देणी चुकती करणे सहज शक्य झाले. चालू हंगामात ब्राझिलने साखर निर्यातीचे करार रद्द करून इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने भारतासाठी जागतिक बाजारात ही मोठी संधी असू शकते.

ब्राझिलमध्ये यंदाच्या हंगामात गाळपासाठी पीक उशिरा दाखल होते आहे. शिवाय जागतिक बाजारातील क्रूड ऑईलचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे ब्राझिलने साखर निर्यातीचे केलेले करार रद्द करून इथेनॉल निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

करार रद्द करण्यापोटी द्यावी लागणारी नुकसानभरपाई सोसूनही हा व्यवहार परवडतो, असे तेथील अर्थशास्त्र सांगते आहे. ब्राझिलची करार रद्द करण्याची ही कृती भारतासाठी लाभदायक ठरू शकते. यंदाच्या भारतीय हंगामात साखर निर्यात आणि इथेनॉल निर्मितीमुळे साखरेच्या हंगामपूर्व शिल्लक साठ्यामध्ये कपात होते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT