Latest

कोल्हापूर : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन जुन्याच गणवेशात

Arun Patil

कोल्हापूर : प्रवीण मस्के : यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर वेळेत शाळा सुरू झाल्या. मात्र, दोन महिने झाले तरी पाच तालुक्यांतील शाळांमधील मुख्याध्यापकांना गणवेशाचे पैसे मिळालेले नाहीत. मुख्याध्यापकांनी गणवेश विक्रेत्यांकडून उधारीवर (क्रेडिट) एक गणवेश घेऊन विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची वल्गनाच ठरली आहे.

यावर्षी शाळा 15 जून रोजी सुरू झाल्या आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यास दोन याप्रमाणे विद्यार्थ्यांना 600 रुपये दिले जातात. जिल्ह्यातील 1 लाख 12 हजार 592 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. मे महिन्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तालुकानिहाय बँकेस शाळांना गणवेशासाठीचे 6 कोटी 75 लाख 55 हजार 200 रुपये देण्यात आले.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बँकेमार्फत सर्व शाळांना 'पीएफएमएस' प्रणालीद्वारे गणवेशाचे पैसे देणे बंधनकारक आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा व तालुक्यांतील सर्व शाळांची खाती सिंगल नोडल एजन्सी (एसएनए) अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहेत. 'पीएफएमएस' प्रणालीद्वारे शाळांना गणवेशाचे पैसे दिले जात आहेत. सध्या गगनबावडा, करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शाहूवाडी वगळता इतर तालुक्यांतील शाळांना बँकेने निधीचे वाटप केले आहे. मात्र, या पाच तालुक्यांतील सुमारे 56 हजार 839 विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे अद्याप शाळांना मिळालेले नाहीत. दोन दिवसांत शाळांना निधी वितरत केला जाईल, असे सांगितले जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (15 ऑगस्ट) आठ दिवसांवर आला आहे. त्या दिवशी तरी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळावा, अशी मागणी मुख्याध्यापकांकडून केली जात आहे.

शिक्षण विभाग-संबंधित बँकेत समन्वयाचा अभाव

शिक्षण विभाग व संबंधित बँकेच्या समन्वयाअभावी पाच तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे गणवेशाचे लाखो रुपये शाळांना अद्याप मिळालेले नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच 15 ऑगस्टला शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे, हे मोठे दुर्दैव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT