किणी; राजकुमार चौगुले : भारतातील आजपर्यंतचे रेकॉर्ड मोडणारे कोंबडीचे अंडे तळसंदे येथील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये मिळाले असून या महाजम्बो अंड्याचे वजन तब्बल 210 ग्रॅम भरले आहे. हे अंडे हायलाईन डब्ल्यू 80 या जातीच्या कोंबडीचे आहे.
जागतिक अंडा दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेले हे अंडे अनेक अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे. हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे दिलीप महादेव चव्हाण यांचा 1983 पासूनचा पोल्ट्री व्यवसाय आहे.
या पोल्ट्रीत व्हाईट लेगॉर्न जातीच्या सुमारे सहा हजार कोंबड्या आहेत.
रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे अंडी जमा करीत असताना त्यांना हे महाजम्बो अंडे सापडले, आश्चर्यचकित झालेल्या चव्हाण यांनी 40 आठवडे वयाच्या कोंबडीने दिलेल्या या अंड्याचे वजन केले असता ते तब्बल 210 ग्रॅम भरले. अंड्याचे वजन सरासरी 45 ते 75 ग्रॅम असते, त्यात जुळे अंडे (बलक) असेल तर त्याचे वजन 90 ते 100 ग्रॅम भरते, गुगल सर्चनुसार आतापर्यंत भारतात सापडलेल्या महाजम्बो अंड्याचे वजन 162 ग्रॅम भरले असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. मात्र तळसंदे येथील या अंड्याने हा विक्रम मोडीत काढला असून या अंड्याचे नेमके वजन कशामुळे वाढले याचा अभ्यास करण्यात येणार आहे.ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शुक्रवार हा जागतिक 'अंडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर या महाजंबो अंड्याबाबत कुतूहल वाढले आहे.