कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील गुळावर कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून राजरोस सुरू असलेली गूळ विक्री संतप्त शेतकरी आणि बाजार समितीच्या अधिकार्यांनी बंद पाडली. यावेळी गूळ व्यापारी नीलेश पटेल याची बाजार समितीचे अधिकारी व शेतकर्यांशी जोरदार वादावादी झाली. पटेल याने उपस्थितांना एका एकाला गोळी घालेन, अशी धमकी दिल्याने मार्केट यार्डात एकच खळबळ उडाली. गूळ उत्पादक शेतकर्यांनी संबंधित व्यापार्यावर कारवाई करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
सध्या गुळाला दर चांगला असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुळाची आवक होत आहे. नीलेश पटेल हा बाजार समितीकडील परवानाधारक व्यापारी आहे. पटेल याचे यार्डात अडत दुकानही आहे. पटेल हा कर्नाटकातून गूळ आणून तो कोल्हापुरी गूळ या नावाने लेबल लावून परराज्यांत विक्री करीत होता, अशी माहिती शेतकर्यांना मिळाली होती. पटेल याने कर्नाटकातून आणलेल्या गुळावर कोल्हापूर गुळाचे लेबल लावण्याचे काम सुरू होते, हा प्रकार सौद्यावेळी शेतकर्यांना समजला.
गूळ उत्पादक शेतकर्यांनी पटेल याच्या दुकानात जाऊन जाब विचारला. याची माहिती बाजार समितीतील अधिकार्यांनाही समजली. त्यांनी तातडीने पटेल याच्या दुकानाकडे धाव घेतली. तेथे पटेल आणि गूळ उत्पादक शेतकरी यांच्यात जोरदार वाद सुरू होता.
यावर अधिकार्यांनी पटेल यास समज देण्याचा प्रयत्न केला; पण मी काहीही करेन, तुम्ही कोण विचारणार? अशी तंबी पटेल याने दिली. एवढेच नाही, तर माझ्या कुणी नादाला लागू नका, एका एकाला गोळी घालेन, अशी थेट धमकी दिली.
बाजार समितीचे उपसचिव के. बी. पाटील यांनी नीलेश पटेल याला यापुढे असा प्रकार घडला तर थेट कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. त्यानंतर पटेल याने पुन्हा असा गूळ आणणार नाही, असे म्हणत नरमाईची भूमिका घेतली.
बाजार समिती सचिव जयवंत पाटील यांना याप्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.