कोल्हापूर ; अनिल देशमुख : कोल्हापुरात लवकरच मत्स्यालय साकारणार आहे. या मत्स्यालयामुळे कोल्हापूरच्या लौकिकात मोलाची भर पडणार आहे. पाच कोटी रुपये खर्चून हे मत्स्यालय उभारले जाणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 2022-23 या वर्षात हे मस्त्यालय पूर्णत्वास आणण्याचे नियोजन आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 100 प्रजाती या मत्स्यालयात पाहता येणार आहेत.
आबालवृद्धांना आकर्षण
बच्चेकंपनीपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच मस्त्यालयाचे आकर्षण असते. काही विशिष्ट आजारात रुग्णांसाठी मासे पाहणे फायदेशीर ठरते, असे सांगण्यात येते. यामुळे अनेक घरांत फिशटँक पाहायला मिळतात. कोल्हापुरात आलेले पर्यटक किमान दोन-तीन दिवस राहावे, याकरिता त्यांना पर्यटनाची साधने उपलब्ध व्हावीत या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून हे मत्स्यालय विकसित करण्यात येणार आहे.
मत्स्य व्यवसायासाठी मार्गदर्शन केंद्र
कोल्हापूर जिल्ह्यात विपुल जलसंपत्ती आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकारची आठ धरणे आहेत. बारमाही वाहणार्या नद्या आहेत. त्यातून गोड्या पाण्यातील मासेमारीच्या व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. याकरिताही हे मत्स्यालय उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीने ते मार्गदर्शन केंद्र म्हणूनही विकसित केले जाणार आहे. देशभरातील गोड्या पाण्यात तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळणार्या 100 प्रजाती या मत्स्यालयात पाहता येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनापुढे सादर केला आहे.
दीड एकर जागेत साकारणार मत्स्यालय
मत्स्य व्यवसाय विभागाची लाईन बझार येथे जागा उपलब्ध आहे. त्यातील सुमारे दीड एकर जागेत हे मत्स्यालय साकारले जाईल. यामध्ये 2500 चौरस फुटांचा टँक राहणार आहे. याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव तयार केला आहे. त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार असून त्यानंतर नावीन्यपूर्ण योजनेतून या कामाला प्रारंभ केला जाणार आहे.