कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आजवरचे गर्दीचे सर्व उच्चांक मोडून रविवारी सातव्या माळेला अंबाबाईच्या दर्शनासाठी सुमारे आठ लाखांवर भाविकांनी गर्दी केली. या गर्दीने कोल्हापूर अक्षरशः ओव्हरपॅक झाले. संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली होती. मिळेल त्या जागी वाहन पार्क करून भाविक दर्शनासाठी गेल्याने संपूर्ण शहराची वाहतूक विस्कळीत झाली.
रविवारी सुट्टी असल्याने मंदिर उघडण्यापूर्वी पहाटेपासूनच भाविकांनी रांग लावली. ही रांग मध्यवर्ती शिवाजी चौकातून उलट फिरून पुन्हा जुना राजवाड्यापर्यंत गेली होती. एवढी प्रचंड गर्दी रविवारी कोल्हापूरने अनुभवली. रविवारी जोतिबाचा जागर असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकच्या कानाकोपर्यातून भाविक जोतिबा व अंबाबाईच्या दर्शनाला आले होते.
शनिवार व रविवारी संपूर्ण शहर गर्दीने फुलून गेले होते. शनिवारी सुमारे पाच लाखांवर भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढीत कोल्हापुरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
महाराष्ट्र, कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक
जोतिबा जागर, रविवारची सुट्टी आणि परगावच्या भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती यामुळे मंदिर उघडण्यापूर्वीच दर्शन रांगेचे दोन्ही मंडप पूर्ण भरून गेले होते. मंडप भरताच जुना राजवाड्यातून रांग बाहेर पडून संपूर्ण भाऊसिंगजी रोडवरून मध्यवर्ती शिवाजी चौकापर्यंत पोहोचली होती.
भाऊसिंगजी रोडवर रांगा
मंदिर उघडताच रांग पुढे सरकू लागली. मात्र येणार्या भाविकांचा ओघ एवढा होता की, पुन्हा मध्यवर्ती शिवाजी चौकापर्यंत रांग कायम होती. सकाळी साडेसात वाजता शिवाजी चौकातून यू टर्न घेऊन रांग उलट भवानी मंडपापर्यंत पोहोचली. त्यामुळे भाविकांना भवानी मंडप ते शिवाजी चौक पुन्हा भवानी मंडप व दर्शन मंडपातून मंदिर असा मोठा प्रवास दर्शनासाठी करावा लागला.
दिसेल तिथे वाहने लावून भाविक दर्शन रांगेकडे
वाहने पार्किंगसाठी कुठेही जागा नव्हती. सकाळी दुकाने बंद असल्याने महाद्वार रोड, गुजरी, बाबूजमाल रोड, रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, रंकाळा तलाव, पेटाळा, देवल क्लब, बालगोपाल तालीम परिसर, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, शिवाजी रोड, लक्ष्मीपुरी हा संपूर्ण परिसर सकाळीच वाहनांनी खचाखच भरून गेला होता. पार्किंग प्लॉट तर पहाटेच पूर्ण भरून गेले होते. त्यामुळे जागा मिळेल तिथे वाहने लावून भाविक दर्शन रांग गाठत होते.
दुपारी अडीच वाजेपर्यंत ही परिस्थिती कायम होती. तीननंतर भाविकांची संख्या थोडीशी कमी झाली. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त उत्सवामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून तसेच गोवा, कर्नाटक येथून खूप मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात आले होते. मोटारीवरील त्यांचे नंबर याची प्रचिती देत होते. या दर्शन रांगेबरोबरच करवीर नगर वाचन मंदिर, जोतिबा रोड, गुजरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, न्यू महाद्वार रोड, कोठीशाळा रोड हे रस्तेही गर्दीने फुलून गेले होते.
आठवड्याभरात 21 लाखांहून अधिक भाविक
शनिवारी पाच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. पाठोपाठ रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 7 लाख 72 हजार 721 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यामुळे आठवड्याभरात दर्शन घेणार्या भाविकांची संख्या 21 लाख 35 हजार 155 पर्यंत पोहोचली आहे. याची नोंद देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही विभागात झाली आहे. दोन वर्षांनंतर देवीच्या दर्शनाची संधी मिळाल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यामुळे दोन वर्षे थांबलेले भाविक अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.