कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा देशभर जावा याकरिता दसरा महोत्सव आयोजित केला जाईल. राज्य सरकारच्यावतीने त्याचा 'स्टेट इव्हेंट' म्हणून साजरा केला जाईल. छत्रपती घराण्याचा मान, परंपरा कायम ठेवून, शाहू महाराज यांच्या मान्यतेनुसारच या सोहळ्याचा आराखडा तयार केला जाईल, त्यानंतर याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी सांगितले.
पालकमंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामे आणि दसरा महोत्सव याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची बैठक घेतली. कोल्हापूरला अनेक परंपरा आहे. त्यात दसरा सोहळ्याचे महत्त्व अधिक आहे. देशभरातील ज्या मोजक्या शहरातील दसरा प्रसिद्ध आहे, त्यापैकी कोल्हापूर एक आहे. यामुळे हा दसरा देशपातळीवर कसा जाईल, त्यातून पर्यटन विकास कसा होईल, यादृष्टीने राज्य सरकारकडून हा सोहळा 'स्टेट इव्हेंट' म्हणून साजरा केला जाईल. यावर्षी दसर्याला तीन-चार दिवस शिल्लक आहेत. मात्र, पुढील वर्षीपासून तो नियोजनबद्ध पद्धतीने होईल, त्याचा आराखडा तयार केला जाईल. याकरिता जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसेच अन्य मार्गानेही याकरिता निधी उभारला जाईल, असे स्पष्ट करत हा महोत्सव भव्य दिव्य होईल आणि केवळ हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पर्यटनाच्या द़ृष्टीने कोल्हापूर इतकी विपूल समृद्धी अन्य कोणत्या शहरात असेल असे वाटत नाही, असे सांगत केसरकर म्हणाले, त्याद़ृष्टीने आराखडा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. जयपूर आणि कोल्हापुरात प्रचंड साम्य आहे, किंबहुना जयपूरपेक्षा कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर ही मोठी विपुलता आहे. यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन विकास नियोजनबद्ध केला जाईल, असेही त्यांंनी सांगितले.
यावेळी लोकप्रतिनिधींनी शालिनी पॅलेस राज्य शासनाने ताब्यात घ्यावा. शाहू समाधी स्थळाचा निधी खुला करावा, शाहू मिलचा विकास करावा, माणगाव परिषदेचा सोहळा आयोजित करावा, राधानगरी, दाजीपूर अभयारण्याला निधी द्यावा, पट्टण कोडोली तीर्थक्षेत्राचा विकास करावा आदी विविध मागण्यांसह सोनवडे-शिवडाव घाट, पंचगंगा प्रदूषण, जिल्हा क्रीडा संकूल, राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्यातील रस्ते विकास, औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध करून नवे उद्योग आणावे आदी विविध मागण्या करत, त्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर त्यांनी या क्षेत्रातील मान्यवरांचीही रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन त्यांच्या सूचना समजावून घेतल्या. रविवारी शाहू महाराज यांची भेट घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्य कृषी परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, सतेज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे, राजेश पाटील आदींसह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय अडथळे काढून टाका
या बैठकीत केसरकर यांनी हे जिल्हा परिषदेचे आहे, ते महापालिकेचे आहे, असले प्रशासकीय अडथळे विकासकामांत आणू नका, ते काढून टाका. सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात शासनाकडूनच निधी दिला जातो आणि सर्व कामे ही लोकांसाठीच केली जातात असेही सांगितले.
सतेज पाटील – धनंजय महाडिक यांनी नजरानजरही टाळली
या बैठकीसाठी माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. आ. पाटील जिल्हाधिकार्यांच्या दालनात एका दरवाजाने तर महाडिक दुसर्या दरवाजाने आत आले. पाटील जिल्हाधिकार्यांसमोर बसल्याने महाडिक थेट सभागृहात जाऊन बसले. यानंतर बैठक सुरू झाल्यानंतर महाडिक आणि पाटील समोरासमोर बसले होते. मात्र, या सर्व कालावधीत दोघांनीही एकमेकांकडे नजरानजर करण्याचेही टाळले, याची उपस्थितांत चर्चा सुरू होती.
जिल्ह्याच्या विकासाला साथ द्या
यावेळी त्यांनी सर्वच लोकप्रतिनिधींना जिल्ह्याच्या विकासाबाबत साथ द्या, असे आवाहन केले. यापूर्वीच्या पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी जी कामे केली आहे, ती कामे पुढे नेली जातील. यासह विकासाची नवीन कामे केली जातील, जिल्ह्याच्या समस्या समजावून घेऊ, प्राधान्याने त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असेही केसरकर यांनी सांगितले.