Latest

कोरोनाने आणखी वाढवली श्रीमंत-गरिबांमधील दरी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : देशात 1995 साली आलेल्या आर्थिक उदारीकरणानंतर सर्वात गरीब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2015-16पर्यंत सातत्याने वाढताना दिसले आहे. मात्र 2020-21 या आर्थिक वर्षात कोरोनामुळे 2015-16सालच्या तुलनेत गरीब कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात तब्बल 53 टक्क्यांची घट झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न घटताना देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात मात्र याच कालावधीत 39 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी (प्राईस) या मुंबईतील संस्थेने केलेल्या आयसीई 360 सर्वेक्षण 2021मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर 2021 दरम्यान केलेल्या या सर्वेक्षणात पहिल्या फेरीत 2 लाख कुटुंबे आणि दुसर्‍या फेरीत 42 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. देशातील 100 जिल्ह्यांसह 120 शहरे आणि 800 गावांमधील कुटुंबांचा या सर्वेक्षणात अभ्यास केल्याचे संस्थेने सांगितले.

लॉकडाऊनमुळे 2020-21 या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी)वरही जाणवला. देशाच्या जीडीपीत तब्बल 7.3 टक्क्यांची घसरण झाली होती. अर्थात शहरी भागातील गरिबांना या महामारीचा सर्वाधिक आर्थिक फटका सहन करावा लागल्याने त्यांच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नात मोठी घट झाल्याचे दिसते.

या सर्वेक्षणात कुटुंबाच्या आर्थिक वार्षिक उत्पन्नानुसार पाच श्रेणींमध्ये विभाजन केलेले आहे. त्यात 20 टक्के गरीब, 20 टक्के कनिष्ठ मध्यम वर्गीय, 20 टक्के मध्यम वर्गीय, 20 टक्के उच्च मध्यम वर्गीय आणि 20 टक्के श्रीमंत नागरिकांचा समावेश केलेला आहे. त्यात सर्वात गरीब असलेल्या वर्गाच्या कौटुंबिक उत्पन्नात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 53 टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नातही 32 टक्क्यांनी घट झाली आहे. मध्यमवर्गीयांच्या वार्षिक उत्पन्‍नावरही या काळात 9 टक्क्यांनी विपरीत परिणाम झाल्याची नोंद आहे.

एकीकडे गरिबांपासून मध्यमवर्गीय कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात घट झालेली असताना उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात मात्र प्रचंड वाढ झाल्याचे दिसते. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात 7 टक्के, तर श्रीमंत कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात याच कालावधीत तब्बल 39 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट होते. सर्वेक्षणात समोर आलेल्या काही ठळक मुद्द्यांमध्ये उदारीकरणानंतर प्रत्येक पाच वर्षांच्या कालावधीत 20 टक्के श्रीमंत कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात दरवर्षी वाढ झालेली आहे.

इतकेच नाही, एकूण उत्पन्नात या गटाचे योगदान प्रत्येकवेळी वाढताना दिसत आहे. याउलट गरीब कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात कधीही घट झालेली नव्हती. मात्र 2021मध्ये प्रथमच या शेवटच्या स्तरामधील कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात मोठी घट पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे 2016च्या तुलनेत या कुटुंबाची कमाई निम्म्यावर आल्याचे दिसते. परिणामी, देशातील गरीब आणि श्रीमंतामधील दरी प्रचंड वाढल्याचे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT