मुंबई ; पुढारी डेस्क : कोविड-19 वरील लसी कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी ठरल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले. मात्र या विषाणूचे आणखी नवे उत्परिवर्तीत उपप्रकार आल्यास प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी नवीन लसी विकसित कराव्या लागतील, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाची चौथी लाट आल्यास वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांचे रक्षण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे ठरेल. त्यासाठी कदाचित सध्याच्या लशींमधील घटकांत बदल करून नवीन लशी तयार कराव्या लागतील, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी रविवारी व्यक्त केले. राजस्थानमधील पिलानी येथे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) येथे थिंक टँक कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
कोविड-19 विषाणूमध्ये आणखी उत्परिवर्तने झाल्यास, अनपेक्षित बदल झाल्यास अथवा वेगवेगळ्या उपप्रकारांचा संयोग झाल्यास सध्याच्या लशींमुळे प्राप्त झालेली रोगप्रतिकारशक्ती अपुरी पडू शकते.
म्हणूनच ज्याप्रमाणे इन्फ्लुएंझाची लस दरवर्षी अद्ययावत करावी लागते; तसेच कोविडवरील लशीबाबतही करावे लागू शकेल, असे त्या म्हणाल्या. त्याबाबत आताच काही अंदाज बांधता येणार नाही; कारण अस्तित्वात असलेल्या लशी सध्याच्या कोरोना विषाणू उपप्रकारांपासून चांगल्याप्रकारे संरक्षण देत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
बालकांचे नुकसान भरून काढणे महत्त्वाचे
कोरोना महामारीमुळे दोन वर्षे शाळेत जाता न आल्यामुळे बालकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना विविध प्रकारे मदत करावी लागेल. त्यांच्या भविष्यातील वाटचालीत कायमस्वरूपी अडथळा ठरणार नाही, यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या.
विषाणू कायम वस्तीला?
आगामी काळात कदाचित कोरोनाचा विषाणू सौम्य किंवा गायब किंवा नष्ट होणार नाही. हा विषाणू फ्लू, श्वसनविकार, मलेरिया आणि क्षयरोग पसरवणार्या विषाणूंसारखा मानवी समुदायात कायमस्वरूपी वास्तव्य करू शकतो, असा इशाराही डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिला. या विषाणूला सोबत घेवूनच जगण्याची मानसिकता आता तयार करणे गरजेचे आहे. त्याला घाबरून न जाता त्याचा खंबीरपणे मुकाबला करावा लागेल, असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.