मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना आणि टाळेबंदीमुळे स्वमग्न विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाची असलेली थेरपी व उपचारपद्धतीला मुकावे लागले यामुळे अनेक स्वमग्न मुलांच्या आरोग्यात अडचणी आल्या आहेत. ज्यांच्यात सातत्यपूर्ण थेरपीमुळे अत्यंत सकारात्मक बदल दिसू लागले होते, ज्यांचा मानसिक विकास होत होता.
कोरोना महामारीमुळे या थेरपीत प्रदीर्घ काळ खंड पडल्यामुळे त्यांच्या मानसिक विकासात नवीन अडथळे आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. ही मुले कायम घरातच राहिल्याने या विशेष मुलांमध्ये वागणुकीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. काही मुले तर घरात चीडचीड, त्रागा करु लागली आहेत. विशेष मुलांच्या मानसिक विकासप्रक्रियेतील बराच कालखंड उपचाराअभावी गेला यामुळे याचे परिणाम अधिक दिसत असल्याचे चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर'चे बालरोगतज्ज्ञ व ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी दिली.
स्वमग्नता ही एक जन्मस्थ न्यूरोलॉजिकल मनोवस्था आहे, जिच्यामुळे मुलांची समाजात मिसळण्याची क्षमता, संवाद आणि वागणूक सामान्य मुलांसारखी नसते. अशा मुलांना सातत्यपूर्ण उत्तेजना आणि समुपदेशन तसंच प्रशिक्षणाची गरज असते. करोना टाळेबंदीमुळे एक ते तीन वर्षांची विशेष बालके आणि तीन ते सहा वर्षांची विशेष प्री-स्कूल मुले यांच्या मानसिक विकास कार्यक्रमात अडथळे निर्माण झाल्याचे डॉ. शिंदे सांगतात.
दोन ते चार या वयोगटात असताना मुलांमध्ये संवाद साधतानाची आणि समाजात मिसळतानाची अडचण दिसून येऊन स्वमग्नता (ऑटिझम) तसेच अटेंशन डेफिसिट हायपअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर यांची लक्षणे आढळून येतात. या वयातच मुलांमधील स्वमग्नतेचे निदान होणे पुढील थेरपी तसंच समुपदेशनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते मात्र कोरोनामुळे हे झाले नाही.
विशेष- स्वमग्न मुलांना घराच्या चार भिंतीतच प्रदीर्घ काळ रहावे लागले. यामुळे त्यांना नियमित थेरपी-उपचार- समुपदेशन उपलब्ध झाले नाही.
आजूबाजूचे लोक, सामान्य समवयीन मुले यांचा सहवास त्यांना लाभला नाही. त्यामुळे समाजात मिसळण्याची क्षमता विकसित झाली नाही.
स्वगम्न तसंच मानसिक विकास-वाढीची समस्या असलेल्या विशेष मुलांसाठी खुले सामाजित वातावरण सर्वात महत्वाचे असते. या वातावरणाला ही मुले मुकली.