मुंबई ; पुढारी डेस्क : कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आहे. निर्बंध उठवण्यात आले आहेत. यात्रा, सण, उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. परंतु, धोका अद्याप टळलेला नाही. कोरोना पुन्हा डोके वर काढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन 15 राज्यांमधील सांडपाण्याची तपासणी करण्यात येत आहे. विविध ठिकाणच्या सांडपाण्याची तपासणी करुन जिनोम सीक्वेन्सींग ही चाचणी करण्याचा निर्णय केंद्रीय संशोधन संस्था इन्सॅकॉगने घेतला आहे.
15 राज्यांमधील विविध 19 ठिकाणांवरील नाल्यांमधील सांडपाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहातील कोरोना विषाणूवर काम करणारे सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
कोची येथील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ.राजीव जयदेवन यांनी सांगितले, कोरोना विषाणू केवळ नाक किंवा घशातच आढळतो असे नाही तर तो आतड्यांच्या माध्यमातूनही त्याचा फैलाव होऊ शकतो. हे लक्षात घेतले तर विष्ठेच्या माध्यमातून नाल्यांमधुन कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो ही बाब नाकारता येत नाही.
त्यामुळे सांडपाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले. तसेच हा विषाणू सांडपाण्यात मोठ्या कालावधीपर्यंत जीवंत राहु शकतो असेही ते म्हणाले. 1 ते 2 लीटर पाण्याच्या चाचणीतून कोरोना विषाणूच्या व्हेरीयंटचा शोध घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मलमुत्रावाटे कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो. लक्षणे नसलेले मोठ्या संख्येने कोरोनाबाधित असु शकतात. यापूर्वी 1920 मध्ये आर्यलँडमध्ये सांडपाण्याची चाचणी करण्यात आली होती. पाण्यातून होणार्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते.