कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : संपले… संपले… म्हणत असताना देशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहण्याची तयारी करू लागले आहे. कोरोनाच्या बीए.4 व बीए.5 या दोन नव्या रूपांनी पुन्हा एकदा उसळी मारली आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये या विषाणूंचा संसर्ग वेगाने पसरू लागला असून, कोल्हापूरकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे कोल्हापूरकरांनी वेळीच सावध होऊन कोरोनाविषयक निर्बंध स्वतःच लावून त्यांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली, तर कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून कोल्हापूरला दूर ठेवता येणे शक्य आहे.
कोरोनाची तिसरी लाट गेल्या वर्षअखेरीस मावळली होती. त्यानंतर जनजीवन सुरळीत होऊ लागले. आर्थिक अरिष्टाचे संकट हळूहळू दूर होत चालले असतानाच कोरोनाच्या या दोन नव्या रूपांनी पुन्हा देशामध्ये आपली दहशत सुरू केली. मुंबईत गेल्या आठवड्यात दैनंदिन सरासरी एक हजार रुग्ण दाखल होत आहेत. संसर्गाचा वेग वाढतो आहे आणि दोन आठवड्यांपासून देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रशासन सज्ज झाले आहे.
बंगळूर शहरात खबरदारीचा उपाय म्हणून तेथील प्रशासनाने मास्क सक्तीसह काही निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकारने सक्ती केली नसली, तरी नागरिकांना मास्क वापरणे आणि बूस्टर डोस घेणे असे दोन पर्याय पुढे ठेवले आहेत. कोल्हापूरकरांनी सक्तीची वेळ येण्यापूर्वीच या दोन्ही पर्यायांची कास पकडली, तर संभाव्य बिघडणारे चित्र रोखता येऊ शकते.
तहान लागली की, विहीर खणायची आणि गरज संपली की, दुर्लक्ष करायचे, हा मानवी स्वभाव आहे. कोरोनाच्या दुसर्या व तिसर्या लाटेत संसर्गाचा आलेख चढू लागल्यानंतर नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत होते. आरोग्य कर्मचार्यांना मारहाण करण्यापासून ते भल्या मोठ्या रांगा लावून नागरिक लसीची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राने पाहिले; पण कोरोना संसर्ग कमी झाला, तसे लसीकरण केंद्रांकडे नागरिकांनी पाठ फिरविली.
लसीचे कोट्यवधी डोस मुदतबाह्य ठरून वाया गेले; पण नागरिकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. आता चौथ्या लाटेने आपले डोके वर काढल्यानंतर नागरिकांनी आता पुन्हा लसीकरण केंद्रांवर गर्दी सुरू केली आहे. अवघ्या आठवडाभरात लसीकरणाचा वेग 20 टक्क्यांनी वाढला आहे. तरीही अद्याप राज्यातील 60 वर्षांवरील बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या 1 कोटी 20 लाख नागरिकांपैकी केवळ 15 टक्के नागरिकांनी तिसरा डोस घेतला आहे. यामुळे हे आव्हान किती मोठे आहे, याची कल्पना येऊ शकते.
…तर आरोग्यावरील संकट टाळणे शक्य
कोल्हापुरात कोरोनाचा अध्याय हा मुंबई, पुण्यातील लाट ओसरल्यानंतर सुरू होतो, असा गेल्या तीन लाटांचा अनुभव आहे. मुंबई, पुण्याचे चाकरमानी आपल्या गावाकडे परतले की, दक्षिण महाराष्ट्रात लागणीला सुरुवात होते. हा अनुभव लक्षात घेतला, तर कोल्हापूरकरांनी चौथ्या लाटेसाठी आतापासूनच कंबर कसणे आवश्यक आहे. सध्या कोल्हापूरच्या कोरोना फलकावर बाधिक रुग्णांची संख्या शून्य असल्यामुळे गाफील राहणे महागात पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर आणि बूस्टर डोस या दोन्ही पर्यायांना जवळ करणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्यावर येणारे संकट टाळता येऊ शकते, आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होऊ शकतो. शिवाय, आर्थिक नुकसानीला लगाम घालता येणे शक्य आहे.