मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये सुरुवातीच्या काळात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आता पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. मृत्यूचे आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या खाली ईशान्येकडील राज्ये, झारखंड आणि बिहार आहे. यावरून महाराष्ट्र लसीकरणामध्ये किती तळाशी आहे हे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 96.2% नागरिकांनी किमान एक लस तर 85.2% लोकांना दोन्ही लसीच्या मात्रा घेतल्या आहेत, तर महाराष्ट्रातील 15 वर्षांवरील 91% नागरिकांनी पहिला डोस, तर 74% नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
महाराष्ट्रातील लसीकरण सध्या एक लाखापर्यंत खाली घसरले आहे, त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यांना दुसरा डोस आणि बुस्टर डोस देण्यासाठी घरोघरी जाऊन मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे. 1.5 कोटींहून अधिक लोकांनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नसल्याचेदेखील समोर आले आहे.
राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई, म्हणाले की, 15-17 वयोगटातील लसीकरणाला मिळणार्या कमी प्रतिसादामुळे राज्याचे सरासरी लसीकरण काही प्रमाणात कमी दिसत आहे; या वयोगटातील 65% लोकांनी एक, तर 45% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. मुंबईसारख्या शहरातदेखील लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. तेथे 57% पहिला, तर 44% दोन्ही डोस घेतले आहेत. कोविड रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या घटल्याने नागरिक लस घेण्यास इच्छुक नाहीत, तर बीडचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश साबळे सांगतात की , नोकर्यांसाठी पुन्हा नागरिक बाहेरगावी जाऊ लागले आहेत, त्यामुळे लसींची मागणी कमी झाली आहे.
देशात दररोज 5 दशलक्ष डोस पुरवठा केला जातो. त्यात आणखी वाढ होऊ शकते. मात्र नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आम्ही प्राथमिक वेळापत्रक, बुस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणात वाढ होण्यासाठी राज्यांशी वैयक्तिकरित्या चर्चा करणार आहोत, असे एनटीएजीआयचे प्रमुख डॉ. के. अरोरा यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याने 15 पेक्षा जास्त वयोगटाच्या 87% नागरिकांनी दोन्ही डोस तर 100% नागरिकांनी एक डोस घेत महाराष्ट्राला मागे टाकले आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 81% नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याने ते राज्यदेखील महाराष्ट्राच्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेशात 97 % नागरिकांनी एक डोस, तर 94 % लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये, बिहार हे महाराष्ट्राच्या मागे असलेले एकमेव राज्य आहे, जिथे 70.9% नागरिकांनी लसीच्या दोन्ही डोसची मात्रा, तर 83% नागरिकांनी केवळ एक डोस घेतला आहे.