कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या आठवड्यात राज्याच्या एकूण बाधित रुग्णांमध्ये 20 टक्के रुग्णांची भागीदारी करणार्या कोल्हापुरात सोमवारी ही संख्या 30 टक्क्यांवर गेल्याचे निष्पन्न झाले. शिवाय राज्यातील एकूण कोरोनाने बळी पडलेल्या रुग्णांच्या 50 टक्क्यांवर रुग्ण कोल्हापूरचे होते. ही स्थिती धोक्याची घंटा वाजवते आहे.
अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या डेल्टा प्रजातीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावतो आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने तातडीने हालचाली गतिमान करून तज्ज्ञांची पथके आणि उपचारांच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे. प्रसंगी केंद्र शासनाकडूनही पथके पाचारण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही वेळ अचूक साधली गेली नाही, तर कोल्हापुरात कोरोना वार्यासारखा पसरण्याचा धोका वर्तविला जातो आहे.
देशात सोमवारी कोरोनामुळे नव्याने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 154 होती. महाराष्ट्रात कोरोनाचे 7 हजार 603 रुग्ण नव्याने बाधित झाले. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या सुमारे अडीच कोटी लोकसंख्येच्या प्रदेशात कोरोनाचे 1 हजार 374 नवे रुग्ण आढळून आले, तर 40 लाख लोकसंख्येच्या कोल्हापुरात मात्र ही संख्या 1 हजार 999 इतकी होती. शिवाय 25 जणांचा बळी घेणार्या कोरोनाच्या मृत्यूचा आलेखही कायम आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या व संख्याशास्त्राचा आधार घेतला, तर दररोज नव्याने दाखल होणार्या कोेरोना रुग्णांची संख्या पाहता कोल्हापुरात सुमारे 8 कोटी लोकसंख्येइतके रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी दवाखान्यात एकही बेड शिल्लक नाही. व्हेंटिलेटर बेडस् तर खासगी दवाखान्यातही उपलब्ध नाहीत, अशी स्थिती आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष त्याच्या मुळापर्यंत शोध घेऊन उपाययोजनांचा सरंजाम उभा करण्याची गरज असताना लोकप्रतिनिधी चाचण्या वाढवा, इतपत ठोकळेबाज घोषणांमध्ये मग्न आहेत. त्यांची कोषातून बाहेर पडण्याची वृत्ती जर काही काळ राहिली, तर कोल्हापूरकरांची झोप उडू शकते.
लॉकडाऊन करूनही संसर्ग वाढला
लॉकडाऊन हा एकमेव उपाय नसल्याने नागरिकांनी कोरोनाशी लढण्यासाठी परिपूर्ण वर्तनात बदल करण्याची आवश्यता असल्याचे मत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. दिलीप कदम यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे आणि त्याला पायबंद घालण्याकरिता लॉकडाऊन केले, तर अर्थकारण कोलमडते. अशावेळी अर्थकारण सुस्थितीत चालू राहावयाचे असेल, तर प्रामुख्याने नागरिकांच्या वर्तनात आणि मानसिकतेत मोठा बदल घडला पाहिजे. सभा, समारंभ, लग्नसोहळे या सार्वजनिक एकत्र येण्याच्या कार्यक्रमांत मोठी खबरदारी घेण्याची गरज आहे. अशा समारंभात नागरिक जेवणावळ आणि फोटोसेशन या दोन वेळेला प्रामुख्याने आपल्या चेहर्यावरील मास्क उतरवतात. याचवेळी नेमका संसर्ग पसरतो आणि हा संसर्ग गावाच्या वाड्या-वस्त्यांपर्यत पोहोचतोे. हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे जसे गरजेचे आहे, तसे चेहर्यावरील मास्क शारीरिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ज्या व्यक्तींनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनीही चेहर्यावरील मास्कचे बंधन काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचीही संसर्गापासून सुटका नाही."