मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वृत्तपत्र कागदाची मुळातच टंचाई आणि सातत्याने दरवाढ होत असतानाच रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर कारणांमुळे आता वृत्तपत्र कागदाच्या तीव्र टंचाईत भरच पडली असून वृत्तपत्र कागदाचे दरही भडकलेले आहेत. या आपत्तीमुळे भारतीय वृत्तपत्र उद्योग हा गंभीर संकटात सापडलेला आहे. या गंभीर संकटामुळे वृत्तपत्र उद्योग चक्रव्यूहातच अडकलेला आहे.
गेल्या काही वर्षांपासून वृत्तपत्र उद्योगापुढील कागदटंचाई आणि भरमसाट दरवाढ हे संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. वृत्तपत्र उद्योगाला जो कागद लागतो, त्यापैकी जवळजवळ 55 टक्क्यांहून अधिक कागद हा परदेशातून आयात करावा लागतो. त्यातही निम्म्यापेक्षा अधिक कागद हा रशियातून आयात केला जातो. रशिया हा भारताला सर्वाधिक वृत्तपत्र कागद पुरवठा करणारा देश आहे.
अमेरिका, कॅनडा, रशिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, चीन आदी देशांतून भारतात वृत्तपत्र कागद आयात केला जातो. त्यापैकी चीनने काही वर्षांपूर्वीच वृत्तपत्र कागद उत्पादन बंदच केले आहे; तर इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियातील न्यूजप्रिंट मिल बंद पडल्या आहेत.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगावर कोरोनाची आपत्ती कोसळली आणि त्यात कोट्यवधी उद्योगधंद्यांबरोबर वृत्तपत्र कागद उद्योगावरही संक्रांत आली. वृत्तपत्र कागद निर्मिती आणि पुरवठा विस्कळीत झाला. त्याचा जबरदस्त फटका भारताला बसला आणि वृत्तपत्र कागदांच्या किमती भडकल्या. उत्पादन घटले. त्यातून थोडा दिलासा मिळतो न मिळतो तोच रशिया-युक्रेन युद्धाचे ढग जमा झाले आणि आता गेल्या 25 दिवसांपासून युद्ध सुरू आहे.
अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध घातले आहेत. रशियातून होणार्या निर्यातीला चाप लागला आहे. रशियाचे इतर देशांशी संपर्क साधणारे सागरी व इतर मार्ग बंद झाले आहेत. जहाज कंपन्या, कंटेनर व्यावसायिक मालवाहतुकीला नकार देत आहेत. या पेचप्रसंगामुळे अभूतपूर्व टंचाई निर्माण होऊन दरवाढीने कळस गाठला आहे.
परदेशात अशी परिस्थिती असताना कच्च्या मालाच्या टंचाईत भारतीय कागद कंपन्यांनी क्राफ्ट पेपर, पॅकिंग पेपर निर्मिती करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वृत्तपत्र कागद टंचाई आणखी वाढली आहे.
दुप्पट दरवाढ
या अभूतपूर्व टंचाईमुळे वृत्तपत्र कागदाचे दर गगनाला भिडले आहेत. अवघ्या दीड-दोन महिन्यांपूर्वी कागदाचा दर होता 40 हजार ते 45 हजार मेट्रिक टन. तो पाहता पाहता टनामागे 80 हजार रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. शाई, रसायने, पार्सल वाहतूक दरातील वाढ या सर्वांवरील खर्चात अलीकडील काळात प्रचंड दरवाढ झालेली असताना वृत्तपत्र कागदाचे दर भडकल्यामुळे आधीच अडचणीत असलेला वृत्तपत्र उद्योग चांगलाच कोंडीत सापडला आहे. कागद दरवाढ आणि कागदटंचाई अशीच सुरू राहिली तर वृत्तपत्र रोज प्रकाशित करणेही कठीण होत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
किंमतवाढीला पर्याय नाही
कागद टंचाईमुळे वृत्तपत्राची पानेही कमी करावी लागतील. तसेच वृत्तपत्राच्या किमतीही वाढवाव्या लागतील. त्याशिवाय वृत्तपत्रे जगू शकणार नाहीत.
महाराष्ट्रातील वृत्तपत्रांतील जीवघेण्या स्पर्धेमुळे मोठी वृत्तपत्रे वाचकांना कमी दरात वृत्तपत्र देऊन संपूर्ण व्यवसायच अडचणीत आणत आहेत. जगातील सर्व देशांत वृत्तपत्राच्या किमती या कागदाच्या किमतीवर अवलंबून असतात. त्यामुळे अगदी पाकिस्तान, श्रीलंका अशा आशियाई देशांत देखील वृत्तपत्रांच्या किमती किमान 10 रु. ते 20 रु.पर्यंत झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतातील इतर राज्यांतदेखील वृत्तपत्रांच्या किमती 6, 8, 10 रु. अशा झालेल्या आहेत. वृत्तपत्रांच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठी वृत्तपत्रे तरी किंमतवाढ करतील, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय वृत्तपत्र व्यवसाय टिकू शकणार नाही.
भारतीय वृत्तपत्रांच्या किमतीच्या तुलनेत परदेशातील वृत्तपत्रांच्या किमती चौपट ते 50-60 पट आहेत. पाकिस्तानातील अर्थव्यवस्था डळमळीत असली, तरी तेथील 'डॉन' या वृत्तपत्राची किंमत 25 रु. आणि 'जंग'ची किंमत 15 रु. आहे. 'सिलोन टाइम्स'ची किंमत 80 रु. आहे. अमेरिकेतील मातब्बर वृत्तपत्र असलेल्या 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या अंकाची किंमत छाती दडपून जाईल अशी आहे.
'न्यूयॉर्क टाइम्स'च्या रोजच्या अंकाची किंमत 3 डॉलर्स म्हणजे सुमारे 225 रु. आहे. अंकाची पानेही 80 ते 100 असतात. याच्याच तुलनेत भारतातील 'टाइम्स ऑफ इंडिया'सारखे वृत्तपत्र 8 रुपयांत 20 ते 40 पानी वृत्तपत्र देतात. म्हणजे 'न्यूयॉर्क टाइम्स' सरासरी सव्वादोन रुपयाला एक पान देते; तर महाराष्ट्रात चार रुपयांना 16 ते 40 पानी अंक दिला जातो. याचाच अर्थ एका रुपयात चार ते दहा पाने दिली जातात. भारत आणि जगातील किंवा शेजारील राष्ट्रांतील व आपल्यातील वृत्तपत्राच्या किमतीत प्रचंड तफावत आहे.
'वॉशिंग्टन पोस्ट' या दुसर्या प्रमुख वृत्तपत्राच्या अंकाची किंमत 2 डॉलर्स ते 3.5 डॉलर्स म्हणजे 150 रु. ते सुमारे 265 रु. एवढी असते. 'पोस्ट'च्या डिजिटल आवृत्तीची मासिक वर्गणी सुमारे 6 डॉलर्स म्हणजे 450 रु. आहे. म्हणजे एका डिजिटल अंकाची किंमत होते 15 रु.! डिजिटल अंकाचा दरही मराठी वृत्तपत्रांच्या किमतीच्या तुलनेत तब्बल पावणेचार पट आहे.