'उत्तर'मध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली; जि.प आणि पंचायत समिती निवडणुकांत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार
उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या मोठी राजकीय खदखद सुरू आहे. तालुक्यात मजबूत असलेल्या तीन गटांमध्येच आता खर्याअर्थाने रस्सीखेच सुरू झाली असली तरी चौथा गट म्हणून शिवसेना कोणासोबत जाणार, याची उत्सुकता आहे. येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोण कोणाबरोबर युती करणार आणि कोण कोण आघाडी करून लढणार, याची जोरदार चर्चा उत्तर सोलापूर तालुक्यात रंगली आहे.
सध्या उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा गट मजबूत आहे. त्यांचा प्रभाव असलेल्या वडाळा आणि नान्नज पंचायत समितीचे दोन्ही गट सर्वसाधारण झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी जोरदार ताकद लावणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बळीरामकाका साठे आता जोरदार फिल्डिंग लावणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे तालुक्यात माजी आ. दिलीप माने यांचीही काही ठिकाणी ताकद असली तरी सध्या माजी आ. माने हे कोणत्या पक्षात आहेत तसेच ते नेमकी कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करणार की, माने गट या निवडणुका स्वबळावर लढणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीची आता चांगलीच तयारी केल्याचे दिसून येत आहे. मार्डी पंचायत समिती गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे खुद्द मार्डीतील राजकीय चढाओढ थांबली आहे. त्यामुळे भाजप आता संपूर्ण तालुक्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेची ताकद तालुक्यात नाममात्र असली तरी कोंडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत गणात कोंडी गाव हे निर्णायक ठरणार असून त्याठिकाणी शिवेसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे तालुक्यात आता शिवसेना-माने गट एकत्र येणार की, भाजप आणि राष्ट्रवादी सोबत लढणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी तालुक्यात कोणत्याच पक्षाची असल्याचे सध्या तरी दिसून येत नाही.
तालुक्यात नव्याने एक जिल्हा परिषद गट, तर दोन पंचायत समिती गण वाढलेले आहेत. वाढलेल्या गटांत कोंडी जिल्हा परिषद आणि कोंडी पंचायत समिती या गणात शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कोंडी गट आणि कोंडी पंचायत समितीवर विजय मिळवता येणार नाही, हे स्पष्ट आहे. तिर्र्हे हा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे त्याठिकाणी भाजप कोणाला उमेदवार देणार आणि त्यांच्याविरोधात कोण असणार, यावर त्या पंचायत समिती गणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
उत्तर पंचायत समितीच्या सहा जागा असून यामध्ये वडाळा आणि नान्नज हे गण सर्वसाधारण आहेत, तर मार्डी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. बीबीदारफळ पंचायत समिती गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. कोंडी आणि तिर्हे गण हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे 'उत्तर'च्या मातब्बर नेत्यांना या आरक्षणाचा चांगलाच फटका बसला आहे. हे आरक्षण राष्ट्रवादी आणि भाजपसाठी मात्र सोयीचे झाल्याचे दिसून येत आहे.
– महेश पांढरे