ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठराविक रकमेच्या मोबदल्यात महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीतील कोट्यवधी नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक करणाऱ्या दोन भावांना बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ६ च्या पथकाने ठाणे व मुंबई शहरात बुधवारी रात्री ही कारवाई सुरू केली. गुरुवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या कारवाईत १० हून अधिक लॅपटॉप, २ हून अधिक हार्ड डिस्क, २ पेनड्राईव्ह, मोबाईल व ३० हून अधिक सीम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपी निखिल येलिगट्टी (२५), राहुल येलिगट्टी (२७) यांच्याशिवाय या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी दैनिक पुढारी सांगितले.
मोबाईल नंबर अथवा आपल्यावर किती कर्ज आहे, कोणत्या बँकेत खाते आहे यांसह अन्य माहिती कोणालाही शेअर केलेली नसतानाही ऑफर देणाऱ्या कंपन्यांकडे आपला नंबर कसा येतो, हा प्रश्न अनेकांसाठी कायम अनुत्त रीत राहिला. याकडे बारकाईने लक्ष ठेवून असताना गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ६ च्या पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांना खबऱ्याने वैयक्तिक माहिती देणाऱ्यांचीच माहिती दिली. त्यानुसार युनिट ६ च्या पथकाने कारवाईसाठी सापळा लावला.
आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक नेमला. त्या ग्राहकाने आरोपी निखिलशी संपर्क साधला असता त्याने २ हजारांच्या मोबदल्यात महिनाभरासाठी पासवर्ड, युजर आयडी व अॅपची माहिती दिली. त्या आयडीनुसार काही पोलिसांनी स्वतःची माहिती तपासली असता नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर याच्यासह आईवडील, इतर नातेवाईकांची माहिती अॅपमध्ये दिसली. कक्ष ६ च्या पथकाने सापळा लावून निखिल येलिगट्टी याला ठाणे पश्चिम येथील कार्यालयातून तर राहुल येलिगट्टी याला मुलुंड पूर्व परिसरातून अटक केली असून १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आधार कार्डसाठी वापरलेल्या सीडीआर संगणक प्रणालीतील माहिती आरोपींनी चोरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही माहिती मिळवण्यासाठी आरोपींनी दोन विशेष अॅप्स बनवले. या अॅप्ससाठी यूजर आयडी, पासवर्ड देण्यात आले. हे अॅप महिनाभर वापरण्यासाठी २ हजार, सहा महिन्यांसाठी १२ तर वर्षभर पाहिजे त्या व्यक्तीची माहिती मिळवण्यासाठी २४ हजार रुपये घेतले जात होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.