Latest

कोकणचा हापूस आंबा थेट युरोपच्या बाजारात

Arun Patil

अलिबाग ; जयंत धुळप : कोकणातील निर्यातक्षम (एक्स्पोर्ट) हापूस आंब्याच्या ग्लोबल कोकण संस्थेच्या माध्यमातून युरोपच्या बाजारपेठेत जाणार्‍या पहिल्या पेटीचे अनावरण राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत करण्यात आले. आता युरोपमध्ये कोकणातील शेतकर्‍यांचा हापूस आंबा थेट निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांमुळे परकीय चलनवृद्धीची नवी संधी उपलब्ध होत असल्याची माहिती ग्लोबल कोकण संस्थेचे संस्थापक संजय यादवराव यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना दिली आहे.

कोकणातील मराठी तरुणांच्या मदतीने संपूर्ण युरोप, जर्मनी, हॉलंड आणि इंग्लंडमध्ये थेट कोकणातून हापूस आंबा निर्यात होणार आहे. युरोपच्या नामांकित बाजारपेठेमध्ये कोकणातील हापूस आंबा सहजपणे उपलब्ध व्हावा, याकरिता ग्लोबल कोकणची टीम काम करत आहे.

संपूर्ण भारतात हापूस आंब्याची बाजारपेठ विकसित करण्याबरोबरच संपूर्ण युरोप आणि जगभरातील अन्य काही देशांमध्ये हापूस आंब्याची बाजारपेठ कोकणातील शेतकर्‍यांकरिता विकसित करण्याचे ग्लोबल कोकण संस्थेने ठरवले आहे.

कोकणातील जवळपास 500 शेतकर्‍यांना एकत्र आणून हापूस आंब्याचे प्रमोशन आणि मार्केटिंग देशांतर्गत आणि जगभरात करण्यात येणार आहे. याकरिता समृद्ध कोकण शेतकरी संघटना कार्यरत आहे. कुणकेश्वर, विजयदुर्ग, राजापूर, आडिवरे, पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे, गुहागर, दापोली, केळशी, श्रीवर्धन, अलिबाग, बाणकोट, वेंगुर्ला, मालवण येथील हापूस आंब्याचे 'ब्रँड' ग्लोबल कोकण विकसित करीत आहे. जगातील सर्वोत्तम आंबट-गोड चवीचे आदर्श मिश्रण, घरभर पसरणारा सुगंध आणि केशरी आकर्षक रंग ही कोकणातील किनारपट्टीच्या हापूस आंब्याची ओळख आहे. हापूस आंबा हा जगातील सर्व फळांचा राजा मानला जातो, त्यामुळे त्याचे ग्राहक जगभरात आहेत. त्यांच्यापर्यंत थेट पोहोचल्यास ही नवी आणि मोठी बाजारपेठ कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे.

कोकणातील उत्तम दर्जाचे हापूस आंबे जगभरातील आंबाप्रेमी खवय्यांना मिळावेत आणि याचा सर्वोत्कृष्ट भाव आणि वर्षभर केलेल्या परिश्रमाची किंमत कोकणातल्या शेतकर्‍यांना मिळावी, म्हणून कोकणातील हापूस आंब्याचा त्या त्या भागातील 'ब्रँड' समृद्ध कोकण शेतकरी संघटना विकसित करीत आहे. या संपूर्ण अभियानाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले.

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्याचे पणन विभागाचे सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते ग्लोबल कोकणच्या निर्यातक्षम हापूस आंब्याच्या पेटीचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी 50 हजार डझन हापूस आंबे युरोपमध्ये विक्रीकरिता पाठविण्याचे ध्येय ठेवून, त्याकरिताचे सर्वस्तरातील नियोजन ग्लोबल कोकण संस्थेने केले आहे.

हापूस आंबा युरोप व अन्य देशांत निर्यात करण्याकरिता हापूसची शास्त्रीय चाचणी करणे अनिवार्य असते. ही चाचणी वाशी-नवी मुंबई येथे पणन महामंडळ आणि अन्य एक शासनमान्य खासगी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यांच्याकडून प्रमाणीकरण केल्यानंतर हापूस आंबा निर्यातीकरिता पाठविण्यात येत असल्याचे यादवराव यांनी सांगितले. सद्यस्थितीत युरोपमध्ये 18 पौंड प्रतिडझन म्हणजे भारतीय 1,800 रुपये डझन असा भाव आहे. येत्या काळात तो आणखी वाढणार असल्याचेही यादवराव यांनी सांगितले.

महामार्गांवर थेट हापूस विक्री, तर 20 ठिकाणी आंबा महोत्सव

हापूस आंब्याच्या निर्यातीबरोबरच मुंबईमध्ये विविध मॉल्समध्ये 'मँगो फ्ली' हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा हापूस आंबा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. याबरोबरच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग या विविध महामार्गांवर 'शेतकरी आंबा बाजार'चे आयोजन करण्यात येणार आहे. या आंबा बाजारामध्ये कोकणातील शेतकर्‍यांचा आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध होईल. याशिवाय मुंबई, पुणे व नाशिक येथे किमान 20 ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे नीलेश सांबरे, आईलिफ कनेक्टचे प्रतिष अंबेकर, अभिषेक पवार आणि संपूर्ण ग्लोबल कोकणची टीम या अभियानाचे संयोजन करत असून, आंबा उत्पादक शेतकर्‍यांमध्येदेखील यानिमित्ताने मोठ्या उत्साहासह व्यावसायिक आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यादवराव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT