Latest

कॉर्डेलिया क्रूझ वर कोरोनास्फोट

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा प्रवासातून परतलेल्या वादग्रस्त कॉर्डेलिया क्रूझ वर कोरोनास्फोट झाला आहे. एकूण 1 हजार 827 प्रवाशापैकी 139 जणांना कोरोनाबाधा झाली असून; 832 जणांच्या चाचणीचे अहवाल अद्याप बाकी असल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कॉर्डेलिया क्रूझ मंगळवारी सायंकाळी ग्रीन गेट येथे आल्यानंतर 60 कोरोनाबाधितांना भायखळ्याच्या रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास जम्बो कोविड केंद्र आणि वेगवेगळ्या हॉटलांत दाखल करण्यात आले. महापालिका प्रशासनाने क्रूझवरील 1,827 प्रवाशांची कोरोना चाचणी केली. त्यापैकी एका प्रयोगशाळेने केलेल्या 995 प्रवाशांच्या चाचणीचे अहवाल मिळाले असून, 139 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. उरलेल्या 832 प्रवाशांचे नमुने अन्य प्रयोगशाळेने घेतले असून, अहवाल आल्यावर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.

प्रवाशांची तपासणी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती. त्यासाठी महापालिकेच्या ए विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ, परिरक्षण अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशी यंत्रणा कार्यरत होती.

पाच रुग्णवाहिका तैनात

कोरोनाबाधित प्रवाशांच्या वाहतुकीसाठी महापालिकेने 17 आसनी क्षमतेच्या 5 रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आलेल्या व्यक्तींना 7 दिवस गृह अलगीकरण सक्तीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT