नवी दिल्ली; वृत्तसंस्था : लखीमपूर खेरीमध्ये शेतकर्यांना चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात भाजप पक्षांतर्गतही नाराजी दिसून येते आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजप नेत्याने या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागली आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार राम इकबाल सिंह यांनी अजय मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. राम इकबाल सिंह उत्तर प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीचे सदस्यही आहेत. ते म्हणाले, लखीमपूर हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा दोषी आहेत. या हिंसाचाराआधी मिश्रा यांनी दिलेल्या भडकाऊ वक्तव्यानेच आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यांनी खरेतर शेतकर्यांची माफी मागितली पाहिजे. मात्र, ते स्वतःच्या मुलाला वाचवण्याचे काम करत आहेत.
गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगा आशिष मिश्रा यांनी शेतकर्यांना जीपखाली चिरडून मारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर त्याला अटक झाली आहे. मात्र, अजय मिश्रा अजूनही केंद्रीय गृह राज्यमंत्रिपदाच्या पदावर आहेत. अशावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना तत्काळ पदावरून हटवले पाहिजे. मागील काही दिवसांत झालेली लखीमपूर हिंसाचाराची घटना आणि गोरखपूरमधील व्यापार्याच्या हत्येने भाजपची बदनामी झाले असल्याचे राम इकबाल सिंह यांनी आरोप केला.