Latest

कॅरिबॅग, थर्माकोलसह प्लास्टिकच्या 19 वस्तूंवर बंदी

अमृता चौगुले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था :  शुक्रवारपासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू झाली. यांतर्गत प्लास्टिक कटलरीसह एकूण 19 वस्तूंवर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बंदी झुगारून कुणी अशा वस्तूंचे उत्पादन, विक्री तसेच वापर करताना आढळून आल्यास दंडासह कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे.
बंदी घातलेल्या वस्तूंचा वापर झाल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या (ईपीए) कलम 15 अंतर्गत कारवाई होईल. प्लास्टिकपासून तयार होणार्‍या अनेक वस्तू बंदी घालण्यात आलेल्या यादीत आहेत. दररोजच्या वापरात सध्या सर्रास असलेल्या वस्तू इथून पुढे वापरात नसतील. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अशा 19 वस्तूंची यादी तूर्त जनतेच्या माहितीस्तव जारी केली आहे. यात आपण फक्‍त एकदा वापरून पर्यावरणाची नासाडी करण्यासाठी इतस्तत: फेकून देतो, अशाच वस्तू बहुतांशी आहेत. सिंगल यूज प्लास्टिक बनविणे, आयात करणे, साठा करणे, विकणे, वापरणे या सर्वांवर बंदी आहे. तूर्त 'एफएमसीजी' (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) क्षेत्राला यातून सूट देण्यात आली आहे, याउपर या क्षेत्राने पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पर्यावरणाच्या हिशेबाने आहे, याची काळजी घ्यावयाची आहे.

बंदी घातलेल्या वस्तू : प्लास्टिक कॅरिबॅग, पॉलिथिन कॅरिबॅग (75 मायक्रॉनहून पातळ), प्लास्टिक स्टीक असलेले ईअर बड्स (कान साफ करण्यासाठी वापरले जाणारे), फुग्यांसाठीच्या प्लास्टिक स्टीक (काड्या), प्लास्टिकचे झेंडे, कुल्फी-कँडीची काडी, आईस्क्रीम स्टीक, थर्माकोल, प्लास्टिक थाळी, प्लास्टिक कप, प्लास्टिक ग्लास, काटे, चमचे, चाकू, स्ट्रॉ (पिण्यासाठीची नळी), मिठाईचे बॉक्स पॅक करण्यासाठीची फिल्म, इन्व्हिटेशन कार्ड, सिगारेटची पाकिटे, 100 मायक्रॉनपेक्षा पातळी प्लास्टिक वा पीव्हीसी बॅनर, स्टिरर (साखर, मीठ मिसळायला देण्यात येणारी वस्तू).

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे निष्कर्ष

भारतात प्रत्येक जण दरवर्षी 18
ग्रॅम सिंगल यूज प्लास्टिक कचरा जन्माला घालतो.
देशात दररोज 26 हजार टन प्लास्टिक कचरा इतस्तत: पसरतो, यातील फक्‍त 60 टक्के गोळा केला जातो.
उर्वरित प्लास्टिक कचरा नदी-नाल्यांत येतो वा जमिनीवर पडून राहतो.
भारतात दरवर्षी 2.4 लाख टन सिंगल यूज प्लास्टिक तयार केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT