Latest

कृषितंत्र : काळ्या गव्हाची लागवड फायदेशीर

Shambhuraj Pachindre

सीना-कोळगाव धरण, उजनी धरण, दहिगाव योजना आदी पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नव्या पिकांकडे वळत आहेत. आता काळ्या गव्हाची शेती जोमात आली आहे. करमाळा तालुक्यातील कविटगाव येथील राम चौधरी, वांगी येथील हनुमंत यादव, माळशिरस येथील सुनील माने हे युवा शेतकरी सेंद्रिय पद्धतीने काळ्या गव्हाचे उत्पन्न घेत आहेत.

जो शेतकरी सेंद्रिय शेती पद्धतीने गव्हाची लागवड, पेरणी करतो, त्यालाच काळ्या गव्हाचे बियाणे विकतात अन्यथा नाही.
काळ्या गव्हाचे संशोधन पंजाब येथील मोहाली विद्यापीठात झाले आहे. या विद्यापीठातून एक क्विंटल गहू मागवला होता. यातील पेरणीसाठी 50 किलो वापरला. हा सर्व गहू सेंद्रिय पद्धतीने प्रक्रिया करून वापरला आहे. लागवडीपूर्वी शेणखत टाकून घेतले. नंतर काळ्या गव्हाची पारंपरिक पद्धतीने पेरणी केली. या गव्हामध्ये आयुर्वेदिक गुण असल्यामुळे या गव्हाला महत्त्व आहे. कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटिन, आयर्न आदी खनिजे व मुलद्रव्य अमाप असल्याने पौष्टिकता वाढली आहे.

काळ्या गव्हाचा उपयोग शिरा, शेवया, चपाती, केक, पोळ्या, थालीपीठ, चकल्या, लाडू व इतर पदार्थांसाठी केला जातो. साध्या गव्हापेक्षा या काळ्या गव्हामध्ये आयर्नचे 60 टक्के प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणताही संसर्गजन्य आजारच नव्हे तर प्रतिकारशक्ती जोमात वाढत असल्याने आजार बळावत नाही. या गव्हामध्ये मॅग्नेशियम, आयर्न, अँटीऑक्सिडंट, लोह प्रोटीन, मिनरल्स तसेच अ‍ॅन्थोसायनीन नावाचा घटक भरपूर प्रमाणात आढळते. लठ्ठपणा, कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, ब्लडप्रेशर, मानसिक तणाव, यासारख्या अनेक आजारांपासून सुटका होण्यास या गव्हाचा आहारात समावेश केल्याने मदत मिळते.

नोव्हेंबर 2020 पासून राम चौधरी हे तरुण शेतकरी काळा गहू हे आंतरपीक म्हणून पिकवत आहेत. ते सीताफळ हे मुख्य पीक घेतात. 120 दिवसात येणार्‍या काळ्या गव्हाच्या वाणाची 1 नोव्हेंबर रोजी एकरी 40 किलोप्रमाणे त्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलाने पेरणी केली. तत्पूर्वी चार ट्रॉली शेणखत टाकून ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट केली. पेरणी केल्यानंतर नियमितपणे साध्या गव्हाप्रमाणेच पाणी दिले. आता काळ्या गव्हाच्या लोंब्या मार्चमध्ये परिपक्व होतील. गेल्या वर्षी नऊ क्विंटल उत्पन्न मिळाले. आताही त्यांना तेवढे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्याही काळ्या गव्हाला सोलापूर, पुणे, सातारा, सागंली जिल्ह्यातील शेतकरी यांच्याकडून मागणी आहे.

– अशपाक सय्यद, करमाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT