पनवेल, पुढारी वृत्त्तसेवा : आपल्या नावे 50 लाख आणि मुलीच्या नावे 50 लाख तसेच आजरा येथील शेतजमीन आपल्या नावावर करण्याची आणि पहिल्या बायकोला सोडचिठ्ठी देण्याची मागणी महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांनी केल्याचे आपल्याला अभय कुरुंदकर यांनी सांगितले होते, अशी साक्ष अश्विनी यांचा कोल्हापूरचा वर्गमित्र प्रशांत मोरे यांनी न्यायालयात दिली.
महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यांच्या मुकुंद प्लाझा या राहत्या घराला रंगकाम करणारा पेंटर संजय प्रल्हाद सुरडकर आणि अश्विनी बिंद्रे यांचा कॉलेजमधील मित्र प्रशांत मोरे यांची साक्ष पूर्ण झाली.
सुरडकर याची साक्ष आणि उलटतपासणी आज पनवेल सत्र न्यायालयात न्या. के. जी. पालदेवार यांच्या समोर झाली. या वेळी पेंटर संजय सुरडकर यांनी, रंगकाम करण्यासाठी जेव्हा कुरुंदकर यांच्या घरी प्रवेश केला त्या वेळेस हॉलमधील फरशीवर लालसर पुसट डाग दिसून आल्याचे सांगितले. महिला पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांच्या हत्याकांडाबाबत अश्विनी बिंद्रे यांचे वडील आणि अन्य साक्षीदार यांची साक्ष मागच्या सुनावणीत झाली होती.आज न्यायालयात अश्विनी बिंद्रे यांचे वर्गमित्र प्रशांत मोरे आणि आरोपी अभय कुरुंदकर यांच्या राहत्या घराला रंगकाम करणारा पेंटर संजय सुरडकर यांची साक्ष आणि उलटतपासणी झाली.
आरोपी अभय कुरुंदकर यांच्या राहत्या घराला रंगकाम करण्याचे काम मला कुंदन भंडारी यांनी दिले होते. या रंगकामापूर्वी अभय कुरुंदकर हे मला एकदाच भेटले होते. मात्र रंगकाम करताना मी जेव्हा पहिल्यांदा घरात प्रवेश केला, त्या वेळेस घरातील मुख्य हॉल मध्ये लालसर पुसट डाग दिसून आले होते. त्या नंतर कुरुंदकर यांच्या सांगण्यानुसार मी घराचे रंगकाम केले होते, असा माहिती जबाब पेंटर संजय प्रल्हाद सुरडकर यांनी दिला होता.
साक्ष आणि उलट तपासणी न्यायालयात झाली त्या वेळेस आरोपीला पेंटर संजय प्रल्हाद सुरडकर यांनी ओळखले आणि उलटतपासणी पूर्ण झाली. अश्विनी बिंद्रे यांचा कोल्हापूरचा वर्ग मित्र प्रशांत मोरे याची साक्ष झाली. त्या वेळेस 2012 पासून अभय कुरुंदकर यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 2015 मध्ये कुरुंदकर आणि अश्विनी बिंद्रे यांच्या वादाचे प्रसंग त्यांनी सांगितले. वाद मिटवण्यासाठी कुरुंदकर यांच्या सांगण्यानुसार मी कोल्हापूर येथून येऊन ठाणे भाईंदर येथील हॉटेल फाऊंटनमध्ये भेट झाली. आणि वादावरील विषयावर चर्चा झाली. त्या वेळेस लग्न करण्यापूर्वी अश्विनी बिंद्रे यांनी केलेल्या मागणीची माहिती कुरुंदकर यांनी मला दिली होती, अशी मागणी बिंद्रे यांनी केल्याचे कुरुंदकर यांनी सांगितल्याचे अश्विनी बिंद्रे यांचा वर्गमित्र प्रशांत मोरे यांनी न्यायालयात सांगीतले. खटल्याची पुढील सुनावणी 27 जानेवारी रोजी होणार आहे.