चेन्नई : येथील 41 वर्षांच्या एका व्यक्तीवर तिसर्यांदा किडनी म्हणजेच मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. उच्च रक्तदाब आणि किडनीच्या गंभीर आजाराशी झगडत असलेल्या या माणसावर चेन्नईच्या मद्रास मेडिकल मिशन हॉस्पिटलमध्ये ही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर आता त्याच्या शरीरातील मूत्रपिंडांची संख्या पाच झाली आहे!
डॉक्टरांनी म्हटले आहे की यावेळेची शस्त्रक्रिया बरीच आव्हानात्मक होती. रुग्ण उच्च रक्तदाबाच्या समस्येने झगडत असल्याने तसेच आधीच्या किडनी हटवल्याशिवायच नवी किडनी प्रत्यारोपित केली जात असल्याने ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची बनली होती.
या रुग्णावर पहिली किडनी ट्रान्सप्लँट सर्जरी 1994 मध्ये झाली होती. त्यावेळी त्याचे वय अवघे चौदा वर्षांचे होते. 2005 मध्ये त्याच्यावर पुन्हा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. ही नवी किडनी बारा वर्षे कार्यरत राहिली.
2016 पासून रुग्णाच्या शरीरातील किडनी वेगाने खराब होऊ लागली. त्यामुळे रुग्णाला आठवड्यातून तीनवेळा डायलिसिस करण्याची वेळ आली. गेली चार वर्षे अशीच काढल्यानंतर आता त्याच्यावर तिसर्यांदा किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.