Latest

काश्मिरी पंडित पुन्हा ‘हिट लिस्ट’वर

Arun Patil

श्रीनगर, वृत्तसंस्था : लष्कर-ए-तोयबाचीच संघटना असलेल्या द रेझिस्टन्स फोर्स अर्थात 'टीआरएफ' या संघटनेला केंद्र सरकारने दहशतवादी संघटना घोषित करून बंदी घालताच चवताळलेल्या टीआरएफने काश्मिरी पंडितांची हिट लिस्टच जारी केली आहे.

सरकारने बंदी घातली तरी आमचा सशस्त्र लढा सुरूच राहील, अशा वल्गनाही या संघटनेच्या प्रवक्त्याने केल्या आहेत. दरम्यान, राजौरी हत्याकांड प्रकरणी 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून बालाकोटमध्ये सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.

दोनच दिवसांपूर्वी केंद्राने टीआरएफ संघटनेवर बंदी घातली होती. संघटनेचा प्रवक्ता अहमद खालीद याने एक पत्रक जारी करीत केंद्राच्या कारवाईचा निषेध केला आणि संघटनेचा लढा सुरूच ठेवण्यात येईल, असे म्हटले आहे. काश्मीरच्या नागरिकांची ही संघटना असून लष्कर-ए-तोयबाशी संबंध नसल्याचा दावाही त्यात केला आहे. यासोबतच संघटनेने काश्मिरी पंडितांची एक हिट लिस्टच जारी केली आहे. हे सर्व जण आमच्या निशाण्यावर आहेत, असेही संघटनेने म्हटले आहे.

'लष्कर'चीच शाखा

मुंबई हल्ल्यात हात असल्याने लष्कर-ए-तोयबावर बंदी घालण्यात आल्यानंतर या संघटनेने दुसर्‍या नावाने कारवाया सुरू केल्या. 2019 मध्ये स्थापन झालेली टीआरएफ 'लष्कर'चीच शाखा आहे. या संघटनेच्या माध्यमातून काश्मिरातील घातपाती कारवाया लष्कर-ए-तोयबा घडवून आणत आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. शेख सज्जाद गुल हा या संघटनेचा कमांडर असून त्याला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. महंमद हबीब ऊर्फ अबू खुबैब यालाही दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मिरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत त्याचा हात होता.

बालाकोटमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बालाकोटमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. राजौरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा समावेश होता. यानंतर भारतीय सुरक्षा दलाने नाकाबंदी करून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्यानंतर जम्मूतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT