काळ्या मिरीची लागवड  
Latest

काळ्या मिरीची लागवड करताना…

Arun Patil

काळी मिरीला मसाले पिकांचा राजा असे संबोधले जाते. भारतात तयार होणार्‍या काळी मिरीस चांगला वास व उत्कृष्ट दर्जा असल्यामुळे तिची 90 टक्के निर्यात एकट्या भारतातून जगभरात होते. उष्ण, दमट व सम हवामान या पिकाला अनुकूल आहे.

कडक उन्हाळा किंवा अति थंड हवेत हे पीक येत नाही. हवेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास काळ्या मिरी या वेलीची वाढ चांगली होऊन भरपूर पीक मिळते.

मध्यम ते भारी जमीन तसेच पाण्याच्या निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. थोडक्यात, ज्या हवामानात नारळ, सुपारी यासारख्या फळझाडांची लागवड होते किंवा होऊ शकते येथे मिरीची लागवड अगदी सहजरीत्या करता येते. मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणे या पिकास सावलीची आवश्यकता असते.

केरळ राज्यातील पेयूर मिरी संशोधन केंद्राचे पेयूर -1 ते पेयूर-4 या नवीन जाती विकसित व प्रसारित केल्या आहेत. राष्ट्रीय मसाला पीक संशोधन केंद्रातून (कालिकत) शुभंकारा, श्रीकारा, पंचमी आणिर पौर्णिमा या जाती विकसित व प्रसारित करण्यात आल्या आहेत. कोकण कृषी विद्यापीठाने पन्नीयूर संशोधन केंद्रातून पन्नीयूर-1 ही संकरीकरण करून तयार केलेली जात आणून कोकणच्या भौगोलिक परिस्थितीत त्या जातीचा निकष आजमावून सदर जात कोकणासाठी प्रसारित केली आहे. सदर जाती पूर्ण वाढीच्या एका वेलापासून सरासरी सात किलो हिरव्या मिरीचे उत्पन्न मिळते. पन्नीयूर-1 जात गावठी मिरीपेक्षा जवळजवळ 3 पट अधिक पीक देते. पन्नीयूर-2 ते पन्नीयूर -5 तसेच श्रीकारा, शुभकारा, पंचमी आणि पौर्णिमा या जातींचा अभ्यासही कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रावर चालू आहे.

मिरीची लागवड परसबागेतील आंबा, फणस यासारख्या झाडांवर स्वतंत्ररीत्या पांगार्‍यात तसेच नारळ, सुपारीच्या बागांमध्ये प्रत्येक झाडांवर दोन वेल चढवून करता येते. यासाठी प्रथम आधाराच्या झाडापासून 30 सेमी अंतरावर 45 बाय 45 बाय 45 से. मी. आकाराचे खड्डे पूर्व व उत्तर दिशेला खोदावेत आणि ते चांगली माती 2 ते 3 घमेली कंपोस्ट किंवा शेणखत व एक किलो सुपर फॉस्फेट किंवा हाडांचा चुरा तसेच 50 ग्रॅम बीएचसी पावडर यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत.

स्वतंत्ररीत्या पांगार्‍यात मिरीची लागवड करावयाची असल्यास मिरीवेल लागवड करण्यापूर्वी एक वर्ष अगोदर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पांगार्‍यात खुंटाची लागवड करावी लागते. अशावेळी योग्य जमिनीची निवड केल्यानंतर 3 बाय 3 मीटर अंतरावर 60 बाय 60 बाय 60 से.मी. आकाराचे खड्डे घेऊन ते खड्डेे चांगली माती 2 ते 3 घमेली, शेणखत किंवा कंपोस्ट व एक किलो सुपर फॉस्फेटने भरून घ्यावेत. अशा खड्ड्यामध्ये 1.5 ते 2 मीटर खोलीच्या पांगार्‍याच्या खुंटाची लागवड करावी. पांगार्‍यामध्ये प्रत्येक झाडाजवळ वर उल्लेख केल्याप्रमाणे पूर्व व उत्तर दिशेस एक एक असे दोन वेल लावावेत. या पद्धतीत पांगार्‍याच्या खुंटाची लागवड करतानाच लाल वेलचीसारख्या उंच जाती केळ्यांच्या मुनव्यांची पांगार्‍याच्या दोन झाडांमधील जागेत लागवड केल्यास मिरीवेलास सुरुवातीच्या काळात सावली मिळते. तसेच केळीपासून पहिली तीन वर्षे उत्पन्नही मिळते.

ज्यावेळी सुपारीमध्ये आंतरपीक घ्यावयाचे असेल त्यावेळी सपारीच्या दोन झाडांमधील अंतर 2.7 ते 3.3 मीटर असावयास पाहिजे; मात्र घट्ट लागवड असल्यास फार सावलीमुळे मिरीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. अशा वेळी बागेच्या चोहीकडेच्या फक्त दोन रांगातील सुपारीच्या झाडांवर मिरीचे वेल चढवावेत. लागवड करताना तयार केलेल्या खड्ड्यात मधोमध मुळ्या असलेली मिरीची रोपे लावावीत. वेल आधाराच्या झाडावर चढण्यासाठी वेलास आधार द्यावा. तीन वर्षांपासून पुढे प्रत्येक वेलास 20 किलो शेणखत/ कंपोस्ट, 300 ग्रॅम युरिया 250 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश व 1 किलो सुपर फॉस्फेट द्यावे. ही खताची मात्रा दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिला हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात व दुसरा जानेवारी महिन्यात द्यावा.

ही खते वेलापासून 30 से. मी. अंतरावर चर खणून त्यामध्ये द्यावीत. लागवडीच्या पहिल्या वर्षी खताचा 1/3 हप्ता, दुसरा वर्षी 2/3 हप्ता, तिसर्‍या वर्षी आणि पुढील प्रत्येक वर्षी संपूर्ण हप्ता द्यावा. आठ वर्षांनंतर पीक मिळू लागल्यानंतर खतांची मात्रा वाढवावी.

काही मिरीचे लहान वेल आधाराच्या झाडावर चढेपर्यंत अधुनमधून त्यांना आधार देणे आणि झाडावर चढण्यासाठी दोरीच्या साहाय्याने बांधणे जरुरीचे असते. वेल 4 ते 5 मीटरहून जास्त वाढू देऊ नये. वेल आधाराच्या पांगार्‍याच्या फांद्या काही प्रमाणात कापून सावली योग्य प्रमाणात ठेवावी. वर्षातून दोनवेळा ऑगस्ट-सप्टेंबर आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वेलाभोवतीची जमीन खोदून भुसभूशीत करावी. मिरीच्या वेलांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात व उन्हाळ्यात 4 ते 6 दिवसांनी पाणी घालावे.

हिरव्या घडातील एक-दोन दाण्यांचा रंग तांबडा-लाल होताच घड तोडावेत. एका पेयूर-1 या जाती वेलापासून सुमारे 5 ते 6 किलो हिरवी मिरी मिळते आणि मिरी वाळविल्यानंतर दीड ते दोन किलो होते. नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढहिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्यात गुंडाळावेत. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवावे.

पाण्याला उकळ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात बुडवून काढावी. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरून त्यावर वाळत ठेवावी. साधारणपणे 7 ते 10 दिवस उन्हामध्ये वाळवावी. म्हणजे काळी कुळकुळीत न सुरकुतलेली उत्तम प्रतीची काळी मिरी तयार होईल.

परंतु, हिरवी मिरी उकळत्या पाण्यात न बुडविता तशीच, जर वाळविली, तर ती चांगल्या प्रकारे काळ्या रंगाची होत नाही. त्यामध्ये काही दाणे भुरकट, तपकिरी रंगाचे होतात व त्यामुळे भेसळ असल्याचा भास होतो. अशा मालाला बाजारभाव कमी मिळतो. म्हणूनच ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. नंतर चांगली वाळलेली काळी मिरी काचेच्या बरणीत अगर घट्ट झाकण असलेल्या भांड्यात ठेवून झाकण घट्ट लावावे. काही मिरीच्या दाण्यात 12 टक्क्यांपेक्षाही जास्त ओलावा असता कामा नये. म्हणजे ती साठविण्याच्या कालावधीत चांगली राहू शकते.

– सत्यजित दुर्वेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT