काळम्मावाडी धरणाच्या गळतीत धरण सुरक्षेसाठी मान्य करण्यात आलेल्या गळतीपेक्षा दुप्पट वाढ झाली आहे. मेघोली धरण फुटल्याने पाटबंधारेच्या दूधगंगा प्रकल्प विभागातर्फे तातडीने तज्ज्ञांनी धरणाची पाहणी केली. गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनेसाठी गुरुवारपासून धरणावर बोअर घेण्यात येणार आहेत. गळतीत वाढ झाली असली, तरी धरणाच्या सुरक्षेस कोणताही धोका नसल्याचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी स्पष्ट केले.
25.40 टीएमसी क्षमतेच्या काळम्मावाडी धरणाने जिल्ह्यातील हरितक्रांतीत भर घातली आहे. या धरणाच्या बांधकामास तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला. 1977 साली बांधकामास प्रारंभ झालेल्या या धरणात 1999 साली पूर्ण क्षमतेते पाणीसाठा करण्यात आला आहे. सध्या या धरणात 446 मीटर पाण्याची लेव्हल आहे. धरण बांधताना धरणातील पाण्याचा दाब वाढून धरणाच्या सुरक्षेस धोका होऊ नये, यासाठी नैसर्गिक पाणी सोडण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यासाठी या धरणातून प्रतिसेकंद 70 लिटर (एलपीएस) एवढ्या नैसर्गिक गळतीस पाटबंधारे नियमानुसार मान्यता आहे. या धरणाची नियमानुसार होणारी गळती 70 लिटर प्रतिसेकंद आहे. मात्र, सध्या ही गळती 190 लिटर प्रतिसेकंद सुरू आहे. यापूर्वी म्हणजे 2000 साली या धरणाची नियमित गळती 398 लिटर प्रतिसेकंद झाली होती. ग्राऊंटिंग करून ही गळती कमी करण्यात आली होती.
या धरणाच्या नियमित गळतीत सध्या पुन्हा वाढ झाल्याने पाटबंधारे खात्याच्या दूधगंगा विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. पुणे येथील सेंटर वॉटर अँड पॉवर रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेकडे तपासणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. पुण्यातील संस्था धरणाची सेसमिक टोमोग्राफी, न्यूक्लियर डेंसिटी आणि बोअर लॉग स्टडी या चाचण्या करणार आहे. या चाचण्या करण्यासाठी कोल्हापूर कार्यालयाने पुण्यातील संस्थेकडे पैसे जमा केले आहेत. शास्त्रज्ञ सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चार शास्त्रज्ञांचे पथक या चाचण्या करण्यासाठी लवकरच कोल्हापुरात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी या धरणावर आठ ठिकाणी बोअर घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. एका बोअरसाठी एक दिवस असे आठ दिवस यासाठी लागणार आहेत. त्यानंतर हे पथक येऊन प्रत्यक्ष चाचण्या करणार आहे. धरणाच्या चाचणीनंतर तज्ज्ञांचे पथक कोल्हापूर कार्यालयास अहवाल देणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष काय उपाययोजना करणार, हे स्पष्ट होणार आहे.
तातडीने उपाययोजना
नियमानुसार असणार्या गळतीत वाढ झाली असली, तरी धरण सुरक्षेस धोका नसून, त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत, असे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी स्पष्ट केले.
द़ृष्टिक्षेपात धरण
1977 बांधकामास प्रारंभ
1999 बांधकाम पूर्ण
1999 पूर्ण क्षमतेने साठा
25.40 टीएमसी साठवण क्षमता
2000 नियमापेक्षा जास्त गळती
धरण सुरक्षेसाठी मान्य गळती
धरणाच्या बांधकामाच्या सांध्यातून होणारा पाण्याचा निचरा, मुख्य भिंतीतून होणारा पाण्याचा निचरा आणि फौंडेशनमधून होणारा पाण्याचा निचरा, अशा तिन्ही प्रकारातून धरणातून नैसर्गिक गळती सुरू असते. या तिन्ही प्रकारातून होणारा पाण्याचा निचरा म्हणजेच नियमानुसार गळती होय.