पणजी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रानंतर आता गोव्यात राजकीय भूकंप झाला. दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी भाजपसोबत काँग्रेसमधील आमदार फोडण्याचे षड्यंत्र केले आहे. याबाबत दोघांवरही पक्षतर्फे कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी स्पष्ट केले. लोबो यांना तत्काळ विरोधी पक्षनेते पदावरून हटविण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली. गेले दोन दिवस सुरू असलेल्या काँग्रेस आमदारांच्या पक्षांतर नाट्यावर रविवारी रात्री अंशतः पडदा पडला. पक्षाने बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत 11 पैकी 5 आमदार उपस्थित असल्याने पक्षातील बंड तूर्त शमले आहे, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राव म्हणाले, कामत आणि लोबो यांना पक्षाने खूप काही दिले. मात्र, त्यांनी सत्ता आणि स्वार्थासाठी पक्षाविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीपूर्वी दोघांनीही पक्षांतर न करण्याबाबत देवासमोर शपथ घेतली होती. मात्र, गेले काही दिवस तेच अन्य आमदारांना पक्ष सोडण्यासाठी फूस लावत होते. आज आमच्यासोबत सहा आमदार असून, येणार्या काही दिवसांत अजून काही आमदार आमच्यासोबत येतील. त्यामुळे भाजपने केलेला पक्षांतराचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. भाजपने काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडणाच्या प्रयत्न केला. भाजप केवळ गोव्यात नव्हे तर देशभरात विरोधकांना आणि मुख्यतः काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. ते पैसा आणि अन्य कायदेशीर संस्थांचा गैरवापर करून विरोधी आमदार फोडत आहेत. मात्र, आम्ही याबाबत जनतेला जागृत करणार आहोत. लोकशाही वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, असेही राव यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी परिषदेत उपस्थित नसलेल्या आमदारांना सांगितले की, आमच्याकडे सहा आमदार असल्याने पक्षांतराचा प्रयत्न असफल झाला आहे. तुम्हाला पक्ष सोडून पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. त्यावेळी तुम्ही कोणत्या तोंडाने मतदारांकडे जाणार याचा विचार करा. काँग्रेसवर विश्वास ठेवल्याने दोन आमदार वगळता अन्य सर्वजण पहिल्यांदाच निवडून आले आहेत, याची जाणीव त्यांनी ठेवावी.
यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा , कुंकळळीचे युरी आलेमाव, सांताक्रूजचे रुडॉल्फ फर्नांडिस आणि हळदोणाचे आमदार कार्लोस फेरेरा उपस्थित होते. तर नुवेचे आमदार अॅलेक्स सिक्वेरा आमच्यासोबत असल्याचा दावा दिनेसह गुंडू राव यांनी दिला. तर मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, दिगंबर कामत आणि राजेश फळदेसाई अनुपस्थित होते.