डेहराडून : 'मिनी काश्मीर' या नावाने सर्वपरिचित असलेल्या मुनस्यारीचे मनमोहक निसर्गसौंदर्य आता पर्यटकांना उंच पुलावरूनही न्याहाळता येणार आहे. उत्तराखंडच्या कुमाऊ विभागात प्रथमच काचेच्या पुलाचे काम सुरू झाले आहे. सीमाभागातील पथिरागड जिल्ह्यात सव्वा कोटी खर्च करून हा पूल उभारण्यात येत आहे. लवकरच या पुलावरून चालण्याचा रोमांचक अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. विशेषत:, येथील सुप्रसिद्ध 'बिर्थी' हा धबधबा पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
पुलाची उंची 23 फूट असेल. हा पूल त्रिकोणी असून, त्यासाठी स्टीलचे अँगल आणि 25 मि.मी. जाडीची काच वापरण्यात येणार आहे. पुलाची लांबी 57 मीटर आहे. तीन पिलरवर तो उभा राहणार आहे. वरती ओपन शेड असणार आहे. दुर्घटनेवेळी मोठा दगड पडला, तरीही यावरील काच तुटणार नाही, इतकी ती मजबूत असेल. डिसेंबर 2023 पर्यंत हा पूल पर्यटकांसाठी खुला होईल.