Latest

कागल हत्या प्रकरण : वरदच्या खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात!

backup backup

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कागल हत्या प्रकरण निष्पाप वरदच्या अमानुष हत्येला आज बारा दिवस होताहेत. कोवळ्या जीवाच्या गळ्याला नख लावणार्‍या माथेफिरूला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या. अंगावर शहारे आणणार्‍या आणि माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेने अख्खा महाराष्ट्र हळहळतोय. खुनाची घटना नरबळीतून झाली नाही, असे सांगितले जात असले, तरी नेमके कारण अजुनही पुढे येत नाही. कारण, गुलदस्त्यामध्ये ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. नरबळी नव्हे, तर माथेफिरूचा छकुल्यावर एवढा क्रोध कशासाठी…?

कागल हत्या प्रकरण तालुक्यातील सोनाळी, सावर्डे बुद्रुकसह पंचक्रोशीवर 7 वर्षीय मुलाच्या हत्येमुळे शोककळा पसरली आहे. नरबळीतूनच हे कृत्य घडले असावे, अशी ग्रामस्थांची भावना असली, तरी तपास यंत्रणेतील प्रमुख अधिकार्‍यांनी त्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे मारेकर्‍याने निष्पाप मुलाचा खून का व कशासाठी केला, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

नातलगासह ग्रामस्थांना वरदच्या हत्येमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. ग्रामस्थांच्या भावना तीव— आहेत. आजोबाच्या घरातून अपहरण करून त्याचा जीव घ्यावा, असा कोणता अपराध छकुल्याने केला होता, हा सवाल आहे.

तपास यंत्रणेला आव्हान!

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात अलीकडच्या काळात कोवळ्या मुलांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्याचे सत्र सुरू झाले आहे. खंडणी वसुली, राजकीय वैमनस्य अथवा स्थावर मालमत्तेचा वादातून घटना घडल्याची उदाहरणे आहेत; मात्र वरदच्या बाबतीत आजवरच्या चौकशीत असा कोणताही मुद्दा पुढे आला नाही. ही वस्तुस्थिती असताना मग माथेफिरूने वरदला संपविण्यासाठी टोकाचे पाऊल का उचललेे, हा मुद्दा आहे. माथेफिरूही पोलिस कोठडीत असताना का उलगडा होत नाही. नरबळीतून हा प्रकार असेल, तर या कृत्यात आणखी कोणाचा सहभाग असावा का, याचाही उलगडा तपास यंत्रणाकडून होत नाही. वरदच्या खुनाच्या कारणाचा छडा लावणे म्हणजे यंत्रणेला आव्हानात्मक ठरत आहे.

पोलिसांनी जंग जंग पछाडले, तरीही…

वरदच्या खुनाच्या कारणाचा छडा लावण्यासाठी वरिष्ठस्तरावर सात-आठ पथके कार्यरत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी आठ दिवस मुरगूडमध्ये तळ ठोकून आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, उपअधीक्षक आर. आर. पाटील, शशिराज पाटोळे आदी घटनास्थळाची पाहणी करून तपासावर नियंत्रण ठेवून आहेत, तरीही खुनामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट होत नाही, हे आश्चर्यजनक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT