Samrjeet Ghatge 
Latest

कागल : समरजितसिंह यांच्यावर गुन्हा नोंद करा

सोनाली जाधव

कागल : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे समाज माध्यमातून व भाषणातून जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये राजकीय कार्यक्रम घेऊन मंदिरे, हॉल परिसर भाड्याने देऊन साहित्य विक्रीचे उपक्रम घेऊन ते मंदिराची व देवाची विटंबना करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने कागल पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून पोलिस स्टेशन समोर आला. पोलिसांनी मोर्चा अडवताच त्याचे सभेत रूपांतर झाले.हसन मुश्रीफ यांच्या कामातच राम आहे. त्यांच्या जन्माचे पुरावे देऊनही खोटा प्रचार केला जात आहे. खोटे दाखले दिले जात आहे. हिंमत असेल तर समरजितसिंह घाटगे यांनी शाळेत येऊन त्यांच्या कागदपत्रांची खात्री करावी, असे आव्हान जिल्हा बँक संचालक भैया माने यांनी दिले.राम मंदिरासाठी वाडा दिला असे समरजित घाटगे म्हणतात. मात्र हा वाडा देवस्थानचा होता. तेथे काही संस्था आणि कार्यालये होती. मुश्रीफ यांनीच पुढाकार घेऊन वाडा मोकळा केला आणि मंदिर उभारले, तेव्हाच विक्रमसिंह घाटगे यांनी त्यांना ट्रस्टचे उपाध्यक्ष केले. मुश्रीफ यांनी साडेतीन कोटी रुपये मंदिरासाठी मिळवून दिले. याचे श्रेय त्यांनी कधीच घेतले नाही, त्यांना कामातून नव्हे तर जातीयवाद फैलावून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माने यांनी केला.

समरजितसिंह घाटगे यांना मुश्रीफ यांच्या जन्माचे पुरावे हवे असतील तर त्यांनी आपली चुलते प्रवीणसिंह घाटगे यांची कमिटी नेमावी, असेही ते म्हणाले.'गोकुळ'ने दिलेल्या जाहिरातीबाबत मुश्रीफ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी काढलेला मोर्चा चुकीचा आहे. श्रीराम हे कुलस्वामी म्हणता. मग तुम्ही मंदिर का बांधले नाही, असा सवाल माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केला.
भाजपच्या तिघांविरोधात तक्रार या मोर्चावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी शाहू कारखान्याचे संचालक बॉबी माने, भाजपचे कार्यकर्ते दीपक मगर व सुनील कदम यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 15 एप्रिल रोजी शहरातील गाव चावडी येथे या तिघांनी भाषणात शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे गाडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

युवराज पाटील, देवानंद पाटील, शशिकांत खोत, प्रवीण काळबर, चंद्रकांत गवळी, रमेश माळी आदी मोर्चात सहभागी झाले होते.
'त्या' फलकाबाबतदेखील तक्रार !श्रीरामांचा मर्यादा पुरुषोत्तम असा उल्लेख आपण सर्व रामभक्त करीत असतो. मात्र कागल येथील श्रीरामाच्या मंदिराकडे जाणार्‍या मार्गावरील फलकावर राम मंदिराकडे असा उल्लेख करण्यात आला आहे. हे निषेधार्थ आहे. प्रभू श्री रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा एकप्रकारे अपमान व विटंबना केल्याबद्दल कागलच्या राम मंदिराच्या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निवेदन पोलिसांना देण्यात आले. याबाबत चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT