Latest

काँग्रेसची दिवाळखोरी

अमृता चौगुले

रुग्ण कितीही वयस्कर आणि त्याचा रोग जुना असला, तरी एखादा नवा डॉक्टर त्यावर उत्तम इलाज करू शकतो. अर्थात, रोगाचे योग्य निदान झाले, तरच इलाजही होऊ शकतो. देशातला सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला नेमका कोणता आजार झाला आहे, हे इतरांना चांगले ठाऊक आहे; परंतु दस्तुरखुद्द काँग्रेस नेतृत्वच आपल्या आजाराबाबत अनभिज्ञ असल्यासारखे वर्तन करीत आहे. दुर्धर आजाराने त्रस्त झालेला रुग्ण कधी अ‍ॅलोपॅथी, कधी होमिओपॅथी, कधी आयुर्वेद असे कुणी सुचवील ते उपचार करून घेत असतो. बुवा-बापूंचे अंगारे धुपारेही करून बघतो, कुठे कुणी गावठी उपचार करून घेत असेल, तर तिकडेही धाव घेतो. परंतु, आपला मूळ आजार मात्र मान्य करीत नाही. त्यासाठी 'रोग रेड्याला आणि औषध पखालीला' अशी एक म्हण मराठीत आहे.

काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या त्यापेक्षा वेगळी नाही. पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व नाही. जो नेता आहे त्याला अधिकृत पद नसल्यामुळे पक्षातील बुजूर्ग त्याची पत्रास ठेवीत नाहीत. निर्नायकी अवस्थेमुळे पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे. या पातळ्यांवर उपाय करण्याची आणि अध्यक्ष निवडीबरोबरच संघटना बांधणी करण्याची गरज असताना ते सोडून प्रशांत किशोर यांच्यासारख्या रणनीतीकाराच्या मदतीने निवडणुकांची मोर्चेबांधणी केली जात आहे, हे काँग्रेस नेतृत्वाच्या दिवाळखोरीचे लक्षण मानावे लागेल. देशात सत्ताधारी पक्ष मजबूत असावा लागतो; परंतु सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षही मजबूत असावा लागतो.

आजघडीला काँग्रेस हाच देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. कारण, देशातील जास्तीत जास्त राज्यांत या पक्षाचे अस्तित्व आहे आणि लोकप्रतिनिधीही आहेत. पक्षाने मरगळ झटकली नाही, तर फार काळ ही परिस्थिती राहणार नाही. आम आदमी पक्षासारखा एखादा पक्ष जास्तीत जास्त राज्यांत हातपाय पसरून काँग्रेसला संकुचित करून टाकेल. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय राजकारणात मिळणार्‍या सन्मानापासूनही पक्ष पारखा होईल. राजकीय भूमिका कोणतीही असली, तरी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची स्थिती सुधारावी, असे अनेकांना वाटते. परंतु, इतरांना वाटते ते काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटते किंवा नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. आव्हानांना सामोरे जाण्यासाठीची जिद्दच काँग्रेस पक्ष गमावून बसल्यासारखा झाला आहे. विकलांग झालेल्या पक्षाच्या नेतृत्वाचा अहंकार एकीकडे आणि सत्ता गमावल्याने वैफल्यग्रस्त बनलेल्या त्या पक्षातील बुजुर्गांचा नेतृत्वाविरुद्धचा कांगावा दुसरीकडे, अशा कात्रीत पक्ष सापडला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय करायला हवे, याचे भान असलेले अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात आहेत. त्यांच्याशी विचारविनिमय करून पुढे जाण्याऐवजी प्रशांत किशोर यांच्यासारखा धंदेवाईक रणनीतीकार पक्षाला अधिक विश्वासार्ह आणि आश्वासक वाटतो, यावरूनच पक्षाच्या अवस्थेची कल्पना येऊ शकते.

हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक, तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची महत्त्वाची धोरणात्मक बैठक रविवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी निवडणुकांचा सविस्तर आराखडा मांडला. त्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि प्रशांत किशोर चर्चेत आले आहेत. खरे तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींसोबत असलेल्या प्रशांत किशोर यांनी नंतर नितीश कुमार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह विविध राजकीय पक्षांसोबत काम केले. मध्यंतरी शरद पवार यांचीही भेट घेऊन त्यांनी हवा निर्माण केली होती आणि आता पुन्हा त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांची मोठी फळी असलेल्या काँग्रेस पक्षाला एखाद्या रणनीतीकाराशिवाय आपली नौका पैलतीराला लागणार नाही, असे वाटत असेल, तर या पक्षाचा एवढा दीर्घकालीन राजकीय अनुभव गेला कुठे म्हणायचा? रणनीतीकाराची भूमिका एका मर्यादित टप्प्यापर्यंत महत्त्वाची असू शकते; परंतु तोच सगळे घडवून आणतो, असे समजणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे आणि काँग्रेस पक्षाचे सगळे नेते सध्या त्या नंदनवनात वावरत आहेत.

लोकसभेच्या 370 जागांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित करण्यासंदर्भातील आराखडा प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींसमवेतच्या बैठकीत सादर केला. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यांमध्ये काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये इतर पक्षांशी आघाडी करून भाजपविरोधात संघर्ष करावा, असा सल्ला त्यांनी दिला. आता हे एवढे प्राथमिक स्तरावरील राजकारण काँग्रेसच्या नेतृत्वाला कळत नसेल आणि त्यासाठी रणनीतीकार लागत असेल, तर काँग्रेस पक्ष नक्कीच राजकीय संन्यासाच्या टप्प्यावर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरातमध्ये यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून भाजपप्रमाणे काँग्रेससाठीही ती प्रतिष्ठेची आहे.

आम आदमी पक्षाने आधीच काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण करून ठेवले आहे. गुजरात काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले असून, आपली दयनीय अवस्था झाल्याची भावना प्रदेश कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षात प्रवेश केला किंवा बाहेरून रणनीती आखून दिली, तरी निवडणूक काँग्रेसलाच लढावी लागणार आहे आणि ती मोदी-शहा यांच्यासारख्या धुरंधरांसमोर लढावी लागणार आहे. त्यासाठीचा आत्मविश्वास कमावून संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांमध्ये चेतना जागृत केल्याशिवाय वर्तमान राजकारणात काँग्रेसचा निभाव लागणार नाही. काँग्रेस नेतृत्वाने हे समजून घेऊन पावले टाकली नाहीत, तर काँग्रेसची बुडणारी नौका प्रत्यक्ष परमेश्वरही वाचवू शकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT