Latest

काँग्रेस : अनाकलनीय घटनाक्रम !

अमृता चौगुले

'जुने ते सोने' मराठी भाषेतली एक उक्‍ती वा म्हण आहे. त्याचा अर्थ घ्याल तसा आहे; पण त्यातला आशय समजून जगण्याचा प्रयत्न केला, तर खूप काही साध्य करता येऊ शकते. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे निदान आपण नको तितके धाडस करून आपल्यावरच संकटे ओढवून आणण्याचे तरी टाळू शकतो. हल्ली काँग्रेस पक्षाला त्याचाच विसर पडला आहे. म्हणूनच 135 वर्षे वयाच्या देशातल्या या सर्वात जुन्या राजकीय पक्षाला खग्रास ग्रहण लागले आहे. त्यातून फुटून बाहेर पडलेल्या व प्रादेशिक पक्ष म्हणून आपला तंबू थाटणार्‍या नेत्यांना वा गटांना यश मिळत असताना काँग्रेसची प्रतिदिन होणारी तारांबळ किंवा नाचक्‍की त्यांच्या विरोधकांनाही आता बघवेनाशी झालेली आहे. कारण, कोणा शत्रूलाही सुचणार नाही अशा कल्पनांच्या आहारी जाऊन काँग्रेस पक्षाची दुर्दशा होत चालली आहे. त्याची साक्ष त्याच पक्षाचे पंजाबमधील एक लोकसभा सदस्य मनिष तिवारी यांनी सोशल मीडियातल्या प्रक्षुब्ध वक्‍तव्यातून दिलेली आहे. मंगळवारी काँग्रेसने आपल्या पक्षात कन्हैयाकुमार या तरुण कम्युनिस्ट नेत्याचा समावेश केला आणि त्यासाठी मोठा समारंभ योजलेला होता; पण त्याची ब्रेकिंग न्यूज होण्यापूर्वीच अशाच एका नवागत काँग्रेस नेत्याने पंजाबात बार उडवून दिला. त्याचे नाव नवज्योतसिंग सिद्धू. अवघ्या 72 दिवसांपूर्वी याच सिद्धूला राहुल गांधी यांनी अनेकांचे आक्षेप झुगारून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनवले होते. अवघ्या दोन महिन्यांत त्याच्याच हट्टापायी तिथले जुनेजाणते काँग्रेस नेते व मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना आपल्या पदाचा थेट राजीनामाही द्यायला लावण्यात आला. थोडक्यात, सिद्धू याचे लाड करण्यासाठीच हा खांदेपालट वा सत्तापालट करण्यात आला. त्याला दहा दिवस होत नाहीत, इतक्यात त्याच सिद्धू महाशयांनी आपल्याही पदाचा राजीनामा देऊन पक्षश्रेष्ठींनाच गोत्यात टाकले आहे. आपण भ्रष्टाचाराशी तडजोड करू शकत नाही, असे म्हणत सिद्धूने राजीनामा फेकला; पण त्यामुळे काँग्रेस अधिकच अडचणीत आलेली आहे. राज्यात पहिलाच दलित मुख्यमंत्री आणला, अशी शेखी मिरवणार्‍या काँग्रेसला त्यामुळे मोठा धक्‍का बसला. कारण, सिद्धू हा अमरिंदर सिंग यांच्याप्रमाणेच उच्चवर्णीय शीख असून त्याला दलित शीख मुख्यमंत्री मान्य नसल्यानेच राजीनामा नाट्य घडले, असा अपप्रचार सुरू झाला आहे. त्याला काय उत्तर द्यायचे, अशी तारांबळ काँग्रेस श्रेष्ठींची झाली आहे. योगायोग असा की, सिद्धू असा धमाल उडवित असतानाच त्याच्याही पलीकडे जाऊन वादग्रस्त बोलू शकणार्‍या आणखी दोघांचे पक्षाने वाजतगाजत स्वागत केले आहे. त्यातला एक कन्हैयाकुमार असून दुसर्‍याचे नाव जिग्‍नेश मेवानी असे आहे.

ज्या काँग्रेस पक्षाला मानणार्‍या कोट्यवधी मतदारांमुळे पक्षाच्या नेत्यांना अजून देशभर स्थान आहे, त्याची खरी पाळेमुळे अमरिंदर किंवा त्यांच्यासारखे शेकड्यांनी लहान-मोठे जुने अनुभवी मुरब्बी नेते आहेत. त्यांच्या कष्टाने व मेहनतीने विधानसभेत बहुमत प्राप्त झाले होते आणि पाच वर्षे सत्ता उपभोगण्याची संधी मिळालेली होती. सिद्धू याच्या कर्तबगारीने वा लोकप्रियतेवर स्वार होऊन ते बहुमत मिळालेले नव्हते, तर अकाली सत्तेच्या विरोधात दहा वर्षे आक्रमक राजकारण करून अमरिंदर यांनी किल्ला लढवला होता. विजयी मुसंडी मारण्याच्या अखेरच्या क्षणी सिद्धू काँग्रेस पक्षात दाखल झाले आणि पुढली निवडणूक येण्यापूर्वी त्यांनी काँग्रेसची पंजाबात उरलीसुरली प्रतिष्ठा व पत धुळीस मिळवून दिलेली आहे. सिद्धू यांची जनमानसात एक प्रसिद्ध प्रतिमा आहे; पण राजकारणी अशी ती प्रतिमा नसून एक हजरजबाबी विनोदवीर अशी आहे. असे लोक गर्दी जमवायला उपयुक्‍त असले, तरी सत्ता वा पक्ष चालवायला पूर्णत: निरूपयोगी असतात. त्यापेक्षा आपल्या कर्तबगारीने लोकांना पक्षाच्या सान्‍निध्यात आणणारे व त्यातून मतांची बेगमी करणारे अमरिंदर पक्षाची पाळेमुळे घट्ट करीत होते. मध्यंतरीच्या घटनांनी ती पाळेमुळेच उखडली गेली आणि त्यासाठी अट्टाहास केलेले सिद्धूच आता बाजूला झालेले आहेत. मुद्दा इतकाच की, यातून काँग्रेस श्रेष्ठींनी साधले काय? मागल्या दोन-तीन दशकांत पुरोगामी वा साम्यवादी पक्षांमध्ये अनेक माध्यमे गाजवू शकणार्‍या नेत्यांचा उदय झाला आणि त्यांनी डावी चळवळ प्रकाशझोतामध्ये आणली; पण जनतेच्या मनात असलेली खरीखुरी डावी चळवळ मात्र त्यांच्या पुस्तकी पांडित्याने जमीनदोस्त करून टाकली. माध्यमांनी त्यांना डोक्यावर घेतले आणि डाव्या चळवळीची सूत्रेच त्यांच्या हाती एकवटत गेली. त्याच प्रकाश करात किंवा सीताराम येच्युरी यांनी देशातली डावी चळवळ जमीनदोस्त करून टाकली. कन्हैयाकुमार त्यांचेच पुढल्या पिढीचे वारस आहेत आणि आता सिद्धू धमाका करीत असताना काँग्रेसने कन्हैयांना पक्षात आणलेले आहे. त्यासाठी जुनेजाणत्या व मुरब्बी ज्येष्ठ नेत्यांना अडगळीत टाकले वा भंगारात काढले आहे. पहिल्याच पत्रकार परिषदेत त्याच कन्हैयाने पत्रकारांच्या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे वा केलेले खुलासे भविष्याची चाहूल देतात. एक सिद्धू पुरेसा नव्हता म्हणून आणखी दोन सिद्धू पक्षात आणले काय, असा प्रश्‍न त्यामुळे पडल्याशिवाय राहत नाही. यातून काँग्रेसला साधायचे काय आहे, ते कळत नाही. जिथे पक्षाचा प्रभाव उरलेला नाही, तिथे संघटनात्मक उभारणी होणे दूर राहिले आहे. उलट कार्यकर्ते व स्थानिक नेते मेहनतीने डागडुजी करतात, त्यांच्या मेहनतीवर पाणी ओतणार्‍यांची राष्ट्रीय नेतृत्व भरती करते, अशी टीका त्यामुळेच होत आहे. राजकीय विश्‍लेषकांचेही डोके चक्रावून जाईल, असा हा अनाकलनीय घटनाक्रम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT